नागपूर विद्यापीठ : प्रशासनाचा दावा, परीक्षा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 10:06 PM2020-10-13T22:06:12+5:302020-10-13T22:10:29+5:30
Nagpur University, Exam राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमधील मोठा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. मंगळवारी विद्यार्थ्याना काही प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागला. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या सर्वांची उत्तरे विद्यापीठाला प्राप्त झाली असल्याचा दावा कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमधील मोठा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. मंगळवारी विद्यार्थ्याना काही प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागला. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या सर्वांची उत्तरे विद्यापीठाला प्राप्त झाली असल्याचा दावा कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी केला आहे.
मंगळवारी दुसऱ्या सत्रात ‘लॉगिन’ होण्यासाठी उशीर लागत होता. अखेर काही वेळाच्या प्रतिक्षेनंतर विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका उघडली. बीए-राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना भाषेचा प्रश्न जाणवला. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत प्रश्न दिसत होते. सोबतच काही विद्यार्थ्यांना ‘सबमिट’ करण्यासाठीदेखील प्रतीक्षा करावी लागली.
दरम्यान, प्रशासनाने काही लहान समस्या सोडल्या तर परीक्षा सुरळीत सुरू असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी ९ हजार ७४५ विद्यार्थी परीक्षा देणे अपेक्षित होते. त्यापैकी ९ हजार १३५ म्हणजेच ९३.७५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, अशी माहिती कुलगुरूंनी दिली.
‘सोशल मीडिया’वरील अफवांवर विश्वास नको
परीक्षा पूर्णत: अयशस्वी ठरत असल्याच्या ‘सोशल मीडिया’वर अफवा पसरल्या आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांनी पेपर पूर्ण झाल्यानंतर एकदा ‘सबमिट’साठी ‘क्लिक’ केले की सर्व उत्तरे विद्यापीठाच्या ‘सर्व्हर’वर जमा होत आहेत. आतापर्यंत १०० टक्के उत्तरे विद्यापीठाला प्राप्त झाली आहेत, असे डॉ.सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले.