नागपूर विद्यापीठ : ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:00 AM2018-09-12T11:00:31+5:302018-09-12T11:01:42+5:30
मागील अनेक वर्षांपासून कुठलाही प्रकारे विद्यापीठाच्या पत्रव्यवहारांना उत्तर न देणाऱ्या ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील अनेक वर्षांपासून कुठलाही प्रकारे विद्यापीठाच्या पत्रव्यवहारांना उत्तर न देणाऱ्या ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत याबाबत मंगळवारी ़निर्णय घेण्यात आला. पुढील पावले उचलण्यासाठी विद्वत् परिषदेला शिफारस करण्यात आली असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
जून महिन्यात नागपूर विद्यापीठाने २५६ महाविद्यालयांतील प्रथम वर्ष प्रवेशांवर बंदी लावली होती. यातील ९८ महाविद्यालयांची संलग्नताच रद्द करण्याचा प्रस्ताव होता. यातील अनेक महाविद्यालयांनी मागील ७ ते ८ वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्जच केला नव्हता. यासंदर्भात महाविद्यालयांना पत्रदेखील पाठविण्यात आले होते. यानंतर ११ महाविद्यालयांनी संलग्नीकरण नूतनीकरणासाठी अर्ज केला. दोन महाविद्यालये बंद करण्याबाबत प्रस्ताव आला. एका महाविद्यालयाने न्यायालयात धाव घेतली. ५८ महाविद्यालयांनी ७ ते ८ वर्षांपासून संपर्कच केला नाही तर उर्वरित महाविद्यालयांनी मागील दोन वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेला नाही. या महाविद्यालयांना परत नोटीस पाठविण्यात आली आहे. ५८ महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यासंदर्भात अधिष्ठाता मंडळाने निर्णय घेतला. याबाबतचा प्रस्ताव विद्वत् परिषदेला पाठविण्याची शिफारस करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला. यानुसार या महाविद्यालयांची संलग्नता निश्चित रद्द होणार असल्याचे डॉ.येवले यांनी सांगितले.
समाजकार्य महाविद्यालयाला स्वायत्तता मिळणार ?
दरम्यान, अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाला स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावावरदेखील चर्चा करण्यात आली. याबाबत दीर्घकाळ चर्चा चालली व अखेर महाविद्यालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. समोरील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव विद्वत् परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. सोबतच या बैठकीत दोन नवीन संशोधन केंद्रांनादेखील मान्यतेच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.