नागपूर विद्यापीठ; अखेर १४ एप्रिलपर्यंतच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 08:35 AM2020-03-29T08:35:11+5:302020-03-29T08:37:24+5:30
अखेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असताना राज्य शासनाकडून विद्यापीठांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश न आल्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली होती; मात्र अखेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अडीचशेहून अधिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून दोन लाख दहा हजारांहून अधिक विद्यार्थी यात बसणार होते. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठाला यासंदर्भात अद्यापही उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कुठलेही पत्र आलेले नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रश्न उपस्थित केला होता हे विशेष.
‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपूर विद्यापीठाने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साधारणत: एक लाख विद्यार्थ्यांच्या १८७ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. १ एप्रिलपासूनचे पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार होते. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठा टप्पा सुरू होणार होता. सुमारे २८३परीक्षांना २ लाख १० हजार विद्यार्थी बसणार होते. त्यात बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी. ई., एम.टेक. (पुरवणी) व एम.ए. यांसारख्या प्रमुख व नियमित परीक्षांचा समावेश होता. आता विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. आतापर्यंत एकूण विद्यापीठाने साधारणत: साडेचारशेहून परीक्षा पुढे ढकलल्या असून यात ३ लाख विद्यार्थी सहभागी होणार होते.
परीक्षा विभागाची कसरतच होणार
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक जारी केल्याचे स्पष्ट केले. आता पुढील परीक्षांचे नियोजन करण्यासंदर्भात परीक्षा विभागाची कसरतच होणार आहे. पुरवणी परीक्षा, नियमित परीक्षा यांच्यासह ‘पोस्टपोन’ केलेल्या परीक्षांचे नियोजन करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर निश्चितच राहणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग झोपेतच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केल्यामुळे साधारणत: १५ एप्रिलपर्यंतच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येतील, असा अंदाज विद्यापीठ वर्तुळात वर्तविण्यात येत होताच. मात्र विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलण्यासाठी शासनाच्या अधिकृत निर्देश अथवा पत्राची आवश्यकता होती; मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभागानेदेखील कुठलेही अधिकृत निर्देश दिलेले नाहीत. विद्यापीठाने अखेर केंद्र शासनाचा गृह विभाग व राज्य शासनाच्या महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ मार्च रोजीच्या पत्राचा आधार घेत विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले. संकटाच्या स्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून याबाबतीत पुढाकार का घेण्यात आला नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.