नागपूर विद्यापीठ : कुलसचिवपदाची घोषणा आज होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:50 AM2019-09-12T00:50:12+5:302019-09-12T00:50:35+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्याकुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. बुधवारी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे ते परत आल्यानंतर गुरुवार किंवा शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार शनिवारी कुलसचिवपदासाठी तर रविवारी परीक्षा व मूल्यमापन विभाग संचालकपदासाठी मुलाखती झाल्या. दोन्ही मुलाखतींसाठी वेगवेगळी निवड समिती होती व दोन्ही समितींनी योग्य उमेदवाराच्या नावावर मोहरदेखील लावली. या मुलाखतीनंतर लगेच घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु कुलसचिवपदाच्या निवडीवरुन राजकारण आडवे आले. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरापर्यंतदेखील घोषणा झाली नव्हती.
यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता नावांची घोषणा कुलगुरूच करतील हे त्यांनी स्पष्ट केले. कुणाची निवड झाली आहे हे मला सांगता येणार नाही. रविवारी मुलाखती आटोपल्या. सोमवारी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करायची होती. मंगळवारी सुटी आली. त्यानंतर बुधवारी नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची मुंबईत बैठक बोलाविली होती. त्यासाठी डॉ.काणे मुंबईला गेले. त्यामुळे बुधवारीदेखील नावाची घोषणा झाली नाही. गुरुवारी किंवा शुक्रवारी घोषणा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
कुलसचिव पदासाठी ३२ उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यानंतर अर्जाची छाननी करुन २३ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले. यापैकी सातच उमेदवारांनी हजेरी लावली. यात प्रभारी कुलसचिव व ‘एलआयटी’चे प्रोफेसर डॉ. नीरज खटी, विद्वत् परिषदेचे सदस्य डॉ. संजय दुधे, डॉ. चौधरी, डॉ.दोंतुलवार, डॉ.नंदनवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. तर रविवारी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकांच्या निवडीसाठी दहा उमेदवार यासाठी पात्र होते. यात डॉ. बी.आर.महाजन, डॉ.अनिल हिरेखण, डॉ.पी.एम.साबळे, डॉ.एस.व्ही.दडवे, डॉ.ए.जे.लोबो, डॉ.ए.एम.धापडे, डॉ.फुलारी, डॉ.आर.के.ठोंबरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.