नागपूर विद्यापीठ : परीक्षेसाठी 'अॅप' की संकेतस्थळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 12:22 AM2021-03-19T00:22:10+5:302021-03-19T00:24:23+5:30
Nagpur University Exam राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. या परीक्षा मागील वेळेप्रमाणे मोबाईल ‘अॅप’ने होणार की यासाठी विशेष संकेतस्थळ राहणार, हे निश्चित झालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. या परीक्षा मागील वेळेप्रमाणे मोबाईल ‘अॅप’ने होणार की यासाठी विशेष संकेतस्थळ राहणार, हे निश्चित झालेले नाही. सोबतच कोणत्या कंपनीला याचे कंत्राट मिळणार हे देखील ठरलेले नाही. यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्यात हे निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे हिवाळी परीक्षादेखील ऑनलाईन माध्यमातूनच होणार आहेत. २५ मार्चपासून बीएस्सी, बीकॉमसह विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा नियोजित आहे. मात्र परीक्षा नेमक्या कशा होणार, हे विद्यापीठाने घोषित केलेले नाही. ‘अॅप’ किंवा संकेतस्थळ विकसित करण्यासाठी एखाद्या कंपनीला कंत्राट द्यावे लागणार आहे. यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कुणाला मिळणार संधी?
उन्हाळी परीक्षात प्रथमच विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सुरुवातीला काही प्रमाणात गोंधळ झाला होता. मात्र त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. विशेष म्हणजे राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठात सर्वात चांगल्या पद्धतीने ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या. आता विद्यापीठ कोणत्या कंपनीला संधी देणार, हे शुक्रवारी स्पष्ट होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार कंपन्यांनी यासाठी रुची दाखविली आहे.