नागपूर विद्यापीठ : उपस्थितीची अट मागे, अंमलबजावणी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:01 PM2020-09-22T23:01:15+5:302020-09-22T23:03:37+5:30
विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयांतील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली होती. मात्र प्राध्यापकांचा विरोध व इतक्या मनुष्यबळाची प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसल्याने आवश्यकतेनुसार बोलवावे, असे निर्देश राज्य शासनाने जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयांतील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली होती. मात्र प्राध्यापकांचा विरोध व इतक्या मनुष्यबळाची प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसल्याने आवश्यकतेनुसार बोलवावे, असे निर्देश राज्य शासनाने जारी केले. विद्यापीठानेदेखील यासंदर्भात पत्र जारी केले. मात्र काही महाविद्यालयांकडून याला वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात येत असल्याची तेथील प्राध्यापकांनीच माहिती दिली आहे.
राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने १८ सप्टेंबर रोजी नवा शासननिर्णय जाहीर केला. विद्यापीठे आणि कॉलेजेस येथे शंभर टक्के उपस्थिती राखली जावी असे त्यात म्हटले होते. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ घेणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. अशा स्थितीत मूल्यांकनाचेदेखील काम जास्त राहणार नाही. अशा स्थितीत सर्व वर्षांना शिकविणाऱ्या शिक्षकांना बोलविण्याची काहीच गरज नाही, असे शिक्षकांचे म्हणणे होते. त्यानुसार शिक्षक संघटनांनी शासनाला निवेदने पाठविली. कोरोनाची स्थिती लक्षात घेता आवश्यकतेनुसार प्राध्यापकांना महाविद्यालयांत बोलवावे असा निर्णय शासनाने जारी केला.
नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी या आदेशानुसार महाविद्यालयांसाठी पत्र जारी केले. मात्र काही महाविद्यालयांनी मात्र विद्यापीठाचे निर्देश गंभीरतेने घेतलेले नाहीत. काही महाविद्यालयांनी आवश्यकता नसतानादेखील बहुतांश शिक्षकांना प्रत्यक्ष येण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.