नागपूर विद्यापीठ : बारसागडे, झाकीउद्दीन यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 10:27 PM2019-09-03T22:27:42+5:302019-09-03T22:29:39+5:30
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षक दिनानिमित्तराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.दीपक बारसागडे व प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.के.एस.झाकीउद्दीन यांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दीक्षांत सभागृहात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या शिक्षकांना सन्मानित करण्यात येईल.
नागपूर विद्यापीठात दरवर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा यात उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक व उत्कृष्ट लेखक या पुरस्कारांचा समावेश आहे. कामठी येथील किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर यांना उत्कृष्ट प्राचार्य तर नागपूर विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सेरिकल्चर अॅन्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेन्ट रिसर्च’ येथील प्राध्यापक डॉ.एम.एम.राय यांना उत्कृष्ट संशोधक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उर्मिला डबीर यांना डॉ.आर.कृष्णकुमार सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल.
५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार या उपस्थित राहतील. तर कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे अध्यक्षस्थान भूषवतील.