नागपूर विद्यापीठ येणार दुसऱ्या श्रेणीत?

By admin | Published: June 6, 2017 02:13 AM2017-06-06T02:13:15+5:302017-06-06T02:13:15+5:30

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे देशभरातील विद्यापीठांची श्रेणी ठरविण्यात येणार आहे. विद्यापीठांना स्वायत्तता प्रदान करीत असताना...

Nagpur University to be in second class? | नागपूर विद्यापीठ येणार दुसऱ्या श्रेणीत?

नागपूर विद्यापीठ येणार दुसऱ्या श्रेणीत?

Next

‘यूजीसी’ तयार करतेय ‘फ्रेमवर्क’ : मसुदा तयार, ‘पीएचडी’ करणे कठीण होण्याची शक्यता
योगेश पांडे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे देशभरातील विद्यापीठांची श्रेणी ठरविण्यात येणार आहे. विद्यापीठांना स्वायत्तता प्रदान करीत असताना तीन श्रेणींमध्ये त्यांना विभागण्यात येणार आहे. यासंदर्भात आयोगातर्फे आराखडा तयार करण्यात येत असून याचा मसुदा तयार झाला आहे. आयोगातर्फे ‘नॅक’चे मूल्यांकन व ‘एनआयआरएफ’मधील (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क) क्रमांक यांच्या आधारावर ही श्रेणी ठरविण्यात येणार आहे. यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ दुसऱ्या श्रेणीत येण्याची शक्यता आहे.
देशभरातील विद्यापीठांच्या प्रणालीत सुसूत्रता यावी व त्यांच्या कामगिरीच्या आधारावर त्यांची श्रेणी ठरावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे काही नियम व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत आहेत. यासाठी आयोगाने मसुदा तयार केला असून १५ जूनपर्यंत यासंदर्भात शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मते मागविली आहेत.
मसुद्यानुसार देशातील विद्यापीठांना तीन श्रेणीत विभागण्याचा प्रस्ताव आहे. ‘नॅक’च्या मूल्यांकनात ३.५ तसेच अधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या आणि ‘एनआयआरएफ’मध्ये देशातील पहिल्या ५० मध्ये क्रमांक असलेल्या विद्यापीठांना पहिली श्रेणी देण्यात येईल. ‘नॅक’ मूल्यांकनात ३.०१ ते ३.४९ ‘सीजीपीए’ मिळविणारे किंवा सातत्याने दोन वर्षे देशातील पहिल्या १०० विद्यापीठांत स्थान मिळविणाऱ्या विद्यापीठांना दुसरी श्रेणी देण्यात येईल. तर वरीलपैकी एकाही श्रेणीत समाविष्ट नसलेली इतर विद्यापीठे तिसऱ्या श्रेणीत राहतील.
नागपूर विद्यापीठाला २०१४ साली ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी मिळाली होती. मात्र ‘एनआयआरएफ’मध्ये नागपूर विद्यापीठाचे स्थान पहिल्या १०० मध्ये नव्हते. तरीदेखील एक अट पूर्ण करत असल्यामुळे नागपूर विद्यापीठाचा समावेश दुसऱ्या श्रेणीत होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयोगातर्फे वर्षातून दोनदा श्रेणी सुधारणेची संधी देण्यात येणार आहे. जर ‘नॅक’चे मूल्यांकन सुधारले असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर ‘रॅकिंग’ वाढले असेल तर विद्यापीठे १ जून व १ डिसेंबरला अर्ज करू शकतील, असे मसुद्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती आयोगाचे सचिव जसपाल संधू यांनी दिली.

तिसरी श्रेणी ‘पीएचडी’धारकांसाठी अडचणीची
तिसऱ्या श्रेणीत जी विद्यापीठे येणार आहेत, तेथून ‘पीएचडी’ किंवा ‘एमफील’ करणे कठीण होणार आहे. आयोगाने तयार केलेल्या मसुद्यानुसार अशा विद्यापीठांमध्ये ‘नेट’ किंवा ‘सेट’ उत्तीर्ण उमेदवारच ‘पीएचडी’ व ‘एमफील’च्या नोंदणीसाठी पात्र ठरतील. विशेष म्हणजे ज्या संशोधनस्थळी उमेदवार प्रवेश घेतील, तेथील श्रेणी विद्यापीठाच्या श्रेणीप्रमाणेच असली पाहिजे, अशी अट आहे. त्यामुळे अनेक विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ इच्छुकांसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी हा मसुदा अद्याप वाचला नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही, असे स्पष्ट केले.

Web Title: Nagpur University to be in second class?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.