नागपूर विद्यापीठ होणार ‘स्मार्ट’
By admin | Published: June 29, 2017 02:33 AM2017-06-29T02:33:41+5:302017-06-29T02:33:41+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लवकरच खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ होणार आहे. छापील पदवी, गुणपत्रिका मिळविणे
पदवी, गुणपत्रिकांना ‘डिजिटल’ स्वरूप :
सामंजस्य करार, ‘एनएडी’सोबत ‘लिंक’ करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लवकरच खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ होणार आहे. छापील पदवी, गुणपत्रिका मिळविणे तसेच सत्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागते. मात्र विद्यार्थ्याची पदवी, गुणपत्रिकांना ‘डिजिटल’ स्वरुप मिळावे व जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून ही प्रमाणपत्रे पाहता यावी यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने अखेर पावले उचलली आहेत. केंद्र शासनाच्या ‘एनएडी’सोबत (नॅशनल एज्युकेशन डिपॉझिटरी) विद्यापीठाला ‘लिंक’ करण्यात येणार असून यासंदर्भात सामंजस्य करारदेखील करण्यात आला आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी पत्रपरिषेदरम्यान दिली. ‘लोकमत’ने वारंवार हा विषय लावून धरला होता हे विशेष.
देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित रहावीत यासाठी केंद्र शासनाने ‘एनएडी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली. राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या ‘ई-रिफॉर्म्स’च्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता ६ महिन्यांअगोदर यासंदर्भात विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली व विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे ‘डिजिटल’ स्वरुपात उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला.
यासंदर्भात ‘एनएसडीएल’ व ‘सीडीएल’ या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत प्रशासनाचे बोलणे झाले होते व त्यांचे सादरीकरणदेखील झाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाने या दोघांपैकी कुणाशीही सामंजस्य करार करण्याची सूट दिली होती. त्यानुसार विद्यापीठाने दोन्ही कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे.
यानुसार आता दीक्षांत समारंभात पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे डिजिटल करण्यात येतील. विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे जगातून कुठूनदेखील पाहता येतील. यासंदर्भात विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ देण्यात येईल. ही सेवा विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध आहे, असे डॉ.येवले यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची पायपीट वाचणार
पदवी, गुणपत्रिका यांचे सत्यापन करण्यासाठी विद्यार्थी तसेच बाहेरील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. शिवाय ‘प्रोव्हिजनल’ प्रमाणपत्र, पदवी पडताळणी इत्यादीमुळेदेखील मनुष्यबळावर ताण पडतो. जगातील अनेक विद्यापीठांत ही सर्व कागदपत्रे ‘आॅनलाईन’ उपलब्ध असून त्यांचे सत्यापन सुकर पद्धतीने होते. त्यामुळे या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची पायपीट वाचेल. सुरुवातीला पदवी प्रमाणपत्रेच ‘आॅ़नलाईन’ उपलब्ध करुन देण्यात येतील. टप्प्याटप्प्याने इतर प्रमाणपत्रेदेखील ‘डिजिटलाईज’ करण्यात येणार आहेत.