‘अटल रॅंकिंग’मध्ये नागपूर विद्यापीठ ठरले ‘प्रॉमिसिंग’; दहा अभियांत्रिकी महाविद्यालयांचा विविध श्रेणीत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:10 AM2022-01-04T07:10:00+5:302022-01-04T07:10:02+5:30
Nagpur News शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या ‘एआयआरआरए’च्या (अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेटिव्ह अचिव्हमेंट्स) क्रमवारीत नागपुरातील दहाहून अधिक शैक्षणिक संस्थांचा समावेश झाला आहे.
नागपूर : शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या ‘एआयआरआरए’च्या (अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेटिव्ह अचिव्हमेंट्स) क्रमवारीत नागपुरातील दहाहून अधिक शैक्षणिक संस्थांचा समावेश झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात ‘प्रॉमिसिंग’ श्रेणीत स्थान मिळाले असून तांत्रिक खासगी महाविद्यालयांच्या गटात जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशात प्रथम स्थान पटकाविले आहे.
देशात शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन वाढावे या उद्देशाने संशोधन क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे क्रमवारी जाहीर करण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली. केंद्रीय निधी प्राप्त तंत्र संस्था, राज्य विद्यापीठे, राज्य स्वायत्त तंत्र महाविद्यालये, बिगर तंत्र सरकारी आणि खासगी विद्यापीठे आणि संस्था अशा श्रेणीत ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात अध्यापन, इनोव्हेशन, स्टार्ट-अप्स, इंडस्ट्री लिंकेज आदी मापदंडांच्या आधारे महाविद्यालये व विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले.
राष्ट्रीय महत्त्व असलेल्या गटात व्हीएनआयटीला ‘परफॉर्मर’ श्रेणीत देशातील पहिल्या वीस संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे, तर सरकारी तांत्रिक महाविद्यालयांच्या गटात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘प्रॉमिसिंग’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.
खासगी तांत्रिक महाविद्यालयांच्या गटात रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘एक्सेलेन्ट’ श्रेणीत स्थान मिळाले आहे.
तीन महाविद्यालये ‘बिगिनर्स’ श्रेणीत
यंदा नागपुरातील पाच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा खासगी तांत्रिक महाविद्यालयांच्या गटात समावेश झाला आहे. यात सेंट व्हिन्सेंट पलौटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व तुळशीराम गायकवाड पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय यांना ‘बिगिनर्स’ श्रेणी, तर जे. डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय यांना ‘प्रॉमिसिंग’ श्रेणीत स्थान मिळाले आहे.
पारंपारिक अभ्यासक्रमांच्या दोन महाविद्यालयांचा समावेश
‘अटल रॅकिंग’मध्ये खासगी महाविद्यालये (गैरतांत्रिक व पारंपरिक) या गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालय, दीक्षाभूमी तसेच सिंधू महाविद्यालय यांना अनुक्रमे ‘परफॉर्मर’ व ‘बिगिनर्स’ श्रेणीत स्थान मिळाले आहे.