नागपूर विद्यापीठ : अखेर ‘बीएड’च्या परीक्षा ‘पोस्टपोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:09 AM2020-11-07T00:09:58+5:302020-11-07T00:11:44+5:30
BEd exams finally postponed राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा ‘पोस्टपोन’ केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी आहेत व त्यामुळे सुरुवातीलाच या परीक्षांना विरोध होता.
नियोजित वेळापत्रकानुसार बीएड प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षांचे ९ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले होते. २०१९-२० मध्ये बी.एड.च्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरु झाली होती. मात्र, पहिला पेपर होताच लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांची प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. त्यामुळे ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अनेक विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. आता नागपुरात येऊन परीक्षा कशी द्यायची व त्या कालावधीत रहायचे कुठे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला होता. कोरोनामुळे परीस्थिती नियंत्रित झाल्यावरच विद्यापीठाने परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. अनेक संघटनांनीदेखील ही मागणी लावून धरली होती. अखेर विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रक जारी केले. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.