नागपूर विद्यापीठ: ‘एमएड’च्या पदकावर ‘बीएड’ची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:16 AM2018-03-26T10:16:13+5:302018-03-26T10:16:21+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान ‘एमएड’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला मिळालेल्या सुवर्णपदकावर चक्क ‘बीएड’ची नोंद करण्यात आली आहे. आता विद्यापीठ यात बदल करून देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान सुवर्णपदकांचा ‘वाद’ गाजला. ही बाब शांत होत नाहीच तो सुवर्णपदकांसंदर्भातील आणखी एक गलथानपणा समोर आला आहे. ‘एमएड’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला मिळालेल्या सुवर्णपदकावर चक्क ‘बीएड’ची नोंद करण्यात आली आहे. भलत्याच अभ्यासक्रमाची नोंद सुवर्णपदकावर असल्यामुळे आता विद्यापीठ यात बदल करून देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठात दानदात्यांकडून आलेल्या निधीतून विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके देण्यात येतात. ‘एमएड’ परीक्षा प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण करून सर्वात जास्त ‘सीजीपीए’ मिळविल्याबद्दल सुयश कॉलेज आॅफ एज्युकेशनच्या प्रियंका अरविंद दुबे यांना पाच सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. डॉ.जी.एस.पाराशर, विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षणविभाग रजत महोत्सवाचे सुवर्णपदक जाहीर झाले होते. शनिवारी झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना हे सुवर्णपदकदेखील प्रदान करण्यात आले. आपल्या मेहनतीचे चीज झाले या अत्यानंदात प्रियंका दुबे होत्या. परंतु घरी गेल्यानंतर ज्यावेळी सर्व पदके पाहिली तेव्हा संबंधित पदकावर ‘एमएड’ऐवजी चक्क ‘बीएड’मधील कामगिरीसाठी मिळालेले सुवर्णपदक अशी नोंद होती. जर अभ्यासक्रम ‘एमएड’चा होता तर सुवर्णपदकावर ‘बीएड’ अशी नोंद आलीच कशी असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
सुवर्णपदके तयार करताना विद्यापीठाकडून संबंधित कंत्राटदाराला विस्तृत यादी देण्यात येते. असे असतानादेखील अशी चूक कुठल्या पातळीवर झाली हा प्रश्न अनुत्तरित आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या मुद्यावर चौकशी करून नेमके बोलता येईल, असे सांगितले. साधारणत: पूर्ण यादीच कंत्राटदाराला देण्यात येते. त्यामुळे जर असे झाले असेल तर पदक बदलून देण्यात येईल, असेदेखील ते म्हणाले.
तारेवरची कसरत करून मिळविले सुवर्णपदक
प्रियंका दुबे-तोडकर यांनी अक्षरश: तारेवरची कसरत करून ‘एमएड’चे शिक्षण घेतले. लग्नानंतर सात वर्षांनी त्यांनी ‘बीएड’ केले व त्यानंतर ‘एमएड’ला प्रवेश घेतला. घरची सर्व कामे, तसेच लहान मुलीला सांभाळून त्यांना उमरेड-नागपूर असा प्रवासदेखील करावा लागायचा. परंतु पती उमाकांत (पप्पू) तोडकर यांचे प्रोत्साहन व आपल्या जिद्दीच्या बळावर त्यांनी अभ्यास केला. अभ्यासक्रमदेखील नवीन असल्याने त्यांना मेहनत करावी लागली.