‘एनएसएस’ पुरस्कारांत नागपूर विद्यापीठ ‘बेस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:18 AM2017-09-25T01:18:24+5:302017-09-25T01:18:37+5:30
परीक्षा प्रणालीत सर्व विद्यापीठांना मागे सोडणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘एनएसएस’मध्येदेखील (नॅशनल सोशल सर्व्हिस) सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परीक्षा प्रणालीत सर्व विद्यापीठांना मागे सोडणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘एनएसएस’मध्येदेखील (नॅशनल सोशल सर्व्हिस) सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला २०१५-१६ सालचा राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत हा समारंभ झाला व विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी याचा स्वीकार केला.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कामगिरीसाठी राज्य शासनाकडून विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नि:स्वार्थ भावनेने काम केलेल्यांचा हे पुरस्कार देऊन राज्य शासनातर्फे गौरव करण्यात आला. मुंबईत २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षांसाठीच्या पुरस्कारांचे वितरण झाले.
डॉ.भाऊ दायदार यांना उत्कृष्ट समन्वयक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या गटात नागपूरच्या मातृसेवा संघ समाजकार्य संस्थेला तिसरा पुरस्कार मिळाला तर याच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.केशव वाळके यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी गटात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर भंडारा येथील जे.एम.पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी साकुरे हिला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक हा पुरस्कार देण्यात आला.
२०१४-१५ या वर्षासाठी एलएडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्वेता फुके हिला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून हिंगणा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे उल्हास मोगलेवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.शिंदे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यापीठाच्या वतीने डॉ.प्रमोद येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले व ‘एनएसएस’च्या माध्यमातून होणाºया सामाजिक कार्यांवर प्रकाश टाकला.