नागपूर विद्यापीठाचा ९६ वा वर्धापन दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:42 AM2019-08-05T11:42:04+5:302019-08-05T11:43:27+5:30
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अत्यंत प्रभावी असून त्यामुळे देशात शैक्षणिक क्रांती घडून येईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. तसेच, या बदलामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अत्यंत प्रभावी असून त्यामुळे देशात शैक्षणिक क्रांती घडून येईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. तसेच, या बदलामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९६ व्या वर्धापन दिवस कार्यक्रमात बोलत होते.
हा कार्यक्रम रविवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी व सत्कारमूर्ती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षण गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग सतत प्रयत्न करीत आहे. देशातील शिक्षण पद्धती विद्यार्थीभिमुख झाली पाहिजे. विद्यार्थ्याची आवड ओळखून त्यानुसार कृती करावी लागेल. सर्वांनी योगदान दिले तरच हे शक्य होईल. विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अकॅडेमिक क्रेडिट बँक ही संकल्पना लवकरच लागू केली जाणार आहे. तसेच, शिक्षकांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल. शिक्षण सुधारण्यासाठी याशिवायही विविध योजना येत्या काळात अमलात आणल्या जातील. संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल असे पटवर्धन यांनी बोलताना सांगितले.
डॉ. काणे यांनी विद्यापीठ उंच भरारी घेतच राहील असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थी केवळ शिक्षणामुळे घडत नसून त्यांना अंतर्बाह्य संस्कारित करण्याची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे असे सांगितले.
रामभाऊ इंगोले यांना जीवन साधना पुरस्कार
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले यांना यावर्षीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर बोलताना इंगोले यांनी नागपूर विद्यापीठाकडून कौतुकाची थाप मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. शिक्षकांच्या भीतीमुळे जास्त शिकू शकलो नाही याची खंत वाटते. परंतु, आज केवळ सामाजिक कार्यामुळे उच्चविद्याविभूषित व्यक्तींसोबत बसण्याची संधी मिळाली अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. इंगोले हे देहव्यापारातील महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करण्याचे महान कार्य करीत आहेत. त्यांनी अनेक मुलांना शिकवून स्वावलंबी केले आहे. त्यांनी समाजापुढे नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.