नागपूर विद्यापीठ; अर्ध्यातून शिक्षण सोडल्यावरदेखील मिळणार प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 06:00 IST2020-12-11T06:00:00+5:302020-12-11T06:00:08+5:30
Nagpur News Education Nagpur University अभियांत्रिकीचा चार वर्षांच्या अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्याने एखादा चांगला संशोधन प्रकल्प पूर्ण केला तर त्याला ‘डिग्री विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राधिकरणांची मान्यता घेण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठ; अर्ध्यातून शिक्षण सोडल्यावरदेखील मिळणार प्रमाणपत्र
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. यंदापासून नवीन अभ्यासक्रम तर लागू होण्याची शक्यता आहेच. शिवाय अभियांत्रिकीतील पदवीची प्रणाली बदलविण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत आहे. अभियांत्रिकीचा चार वर्षांच्या अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्याने एखादा चांगला संशोधन प्रकल्प पूर्ण केला तर त्याला ‘डिग्री विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राधिकरणांची मान्यता घेण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पदवी प्रणालीतदेखील बदल करण्याच्या मुद्याचा अंतर्भाव आहे. त्याचाच आधार घेत नागपूर विद्यापीठात यासंदर्भात बदल करण्याची सुरुवात झाली आहे. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश तर घेतात. मात्र ते अंतिम वर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांना कुठलीही पदवी तर मिळतच नाही, शिवाय प्रमाणपत्रदेखील नसते. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलेले दोन किंवा तीन वर्ष वायाच जातात. मात्र यापुढे अशा विद्यार्थ्यांनादेखील कुठले ना कुठले प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाकडून ‘इंटरमिडीएट एक्झिट’ची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी शिक्षण सोडून गेला तरी त्याला तसे प्रमाणपत्र मिळू शकेल.
आता अभियांत्रिकीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘बॅचलर ऑफ इंजिनिअरींग’ अशी पदवी मिळते. परंतु आता ही प्रणालीदेखील बदलणार आहे. एखाद्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याने शिक्षण सुरू असतानाच त्याच्याच अध्ययन क्षेत्रात दर्जेदार संशोधन प्रकल्प केला तर त्याला ‘बीई विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येईल. यासंदर्भात नवीन शैक्षणिक धोरणातदेखील उल्लेख असून त्याचे पालन विद्यापीठ करेल. लवकरात लवकर ही प्रणाली लागू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, असे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘क्रेडिट्स’चे महत्त्व वाढणार
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पदवी देत असताना त्यांच्या ‘क्रेडिट्स’वर भर राहणार आहे. यामुळे ‘क्रेडिट्स’चे महत्त्व वाढेल व त्यासाठी ‘एबीसी’ची (अॅकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट) स्थापना करण्यात येईल. ‘बीई विथ रिसर्च’ किंवा ‘ऑनर्स’ची पदवी देत असताना या ‘क्रेडिट्स’चा आधार घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी एखादा संशोधन प्रकल्प केला तर त्यांच्या नावावर कामाच्या दर्जानुसार ‘क्रेडिट्स’ जमा होतील.