नागपूर विद्यापीठ ; कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी अद्यापही मुहूर्त नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:02 PM2020-02-13T12:02:49+5:302020-02-13T12:03:21+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास पावणेदोन महिने उरले आहेत. परंतु अद्यापही कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी राज्यपाल कार्यालयातर्फे पुढाकार घेण्यात आलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास पावणेदोन महिने उरले आहेत. परंतु अद्यापही कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी राज्यपाल कार्यालयातर्फे पुढाकार घेण्यात आलेला नाही. निवड समिती घोषित करण्यासाठी विलंब का होत आहे, हे एक कोडेच आहे. दरम्यान, पावणेदोन महिन्यानंतर विद्यापीठाचा कारभार कुणाकडे जाणार, यासंदर्भात विविध तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होतो आहे. त्याअगोदर नवीन कुलगुरूंची निवड होणे अपेक्षित आहे. परंतु सद्यस्थितीत निवड समितीचीच घोषणा झालेली नाही. त्यामुळे पूर्णवेळ कुलगुरू या कालावधीत मिळणे अशक्यप्राय बाब आहे.
साधारणपणे कुलपती कार्यालयाकडून नवीन कुलगुरू नियुक्तीकरिता निवड समिती स्थापन करणे, जाहिरात देणे व अर्ज मागवून त्यातील पहिल्या पाच जणांची निवड करण्याची प्रक्रिया काही आठवड्यांअगोदरच सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, निवड समितीच स्थापन झाली नसल्याने पुढील प्रक्रिया कधी होईल, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
६ एप्रिलपर्यंत नवीन कुलगुरूंची निवड होणे अशक्य आहे. त्यामुळे त्यानंतर कुलगुरूपदाची प्रभारी जबाबदारी कुणाकडे सोपविली जाणार, हा मोठा प्रश्न आहे. विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाकडे हा कार्यभार जाण्याची शक्यता आहे.
समिती सदस्याचे नाव डिसेंबरमध्येच ठरले
कुलगुरू निवड समितीतील एका सदस्यासाठी विद्यापीठातील विद्वत् परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त बैठक डिसेंबर महिन्यात झाली होती. त्या बैठकीत आयआयटी कानपूर येथील संचालक डॉ. अभय करंदीकर यांची समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला दोन्ही प्राधिकरणांच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानुसार डॉ. अभय करंदीकर यांच्या नावाचा प्रस्ताव सादर कुलपती कार्यालयाला पाठविण्यात आला. विद्यापीठाकडून समिती सदस्याचे नाव गेल्यानंतर काही दिवसातच समिती अध्यक्ष स्थापन होणे आवश्यक होते. परंतु, असे होऊ शकले नाही.