नागपूर विद्यापीठ : आठवड्याभरातच बदलले प्रभारी कुलसचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:22 AM2019-04-19T00:22:49+5:302019-04-19T00:23:34+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी परत एकदा बदल करण्यात आला आहे. डॉ. नीरज खटी यांच्या जागेवर वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आठवडाभरातच कुलगुरूंनी प्रभारी कुलसचिवपदाची सूत्रे डॉ. हिवसे यांच्याकडून काढली आहेत. आता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाचा भार देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी परत एकदा बदल करण्यात आला आहे. डॉ. नीरज खटी यांच्या जागेवर वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आठवडाभरातच कुलगुरूंनी प्रभारी कुलसचिवपदाची सूत्रे डॉ. हिवसे यांच्याकडून काढली आहेत. आता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाचा भार देण्यात आला आहे.
डॉ. नीरज खटी यांची ‘एलआयटी’त निवड झाल्यामुळे त्यांनी परीक्षा व मूल्यमापन संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे प्रभारी कुलसचिवपददेखील रिक्त झाले. त्यांच्या जागी प्रभारी कुलसचिवपदाचा प्रभार वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर परीक्षा व मूल्यमापन विभागाची जबाबदारी उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्याकडे देण्यात आली होती. मुळात प्रभारी कुलसचिवपदाची जबाबदारी डॉ. हिरेखण यांच्याकडे सोपविण्यात येईल, असा अंदाज होता. मात्र असे झाले नाही.
दरम्यान, डॉ. हिवसे यांच्या नावाची पाटीदेखील कुलसचिव कार्यालयासमोर लागली. मात्र गुरुवारी तडकाफडकी त्यांच्याकडून सूत्रे काढून घेतली व त्यांच्याऐवजी डॉ. देशपांडे यांना जबाबदारी सोपविण्यात आली. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा बदल नेमका का झाला याबद्दल कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
आठ महिन्यांपासून रिक्त आहे पूर्णवेळ पद
कुलसचिव पदावरून डॉ. पुरण मेश्राम यांना निवृत्त करण्यात यावे, असे निर्देश राज्य सरकारकडून आल्यानंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी डॉ. मेश्राम यांना निवृत्तीचा आदेश दिला होता. ऑगस्ट २०१८ पासून पूर्णवेळ पद रिक्त आहे. डॉ.खटी यांच्याकडे प्रभारी कुलसचिव बनविण्यात आले होते. दरम्यान, विद्यापीठाने नियमित कुलसचिव पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. शेवटच्या तारखेपर्यंत २६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये डॉ. नीरज खटींसह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र, नेमक्या मुलाखती कधी होतील, हे अस्पष्टच आहे.
प्रभारी कुलगुरू झाले प्रभारी कुलसचिव
डॉ. विनायक देशपांडे हे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत. डॉ. देशपांडे हे अर्थशास्त्र विभागाशी गेल्या ३२ वर्षांपासून जुळलेले आहेत. विद्यापीठाची विधिसभा, व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणांमध्ये काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलगुरू म्हणूनदेखील काम केले आहे. प्रभारी कुलगुरूपदानंतर आता ते प्रभारी कुलसचिवपदाची जबाबदारी सांभाळतील.