नागपूर विद्यापीठाचा दावा, पूर्ण परीक्षा 'फ्लॉप' नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 09:16 PM2020-10-08T21:16:55+5:302020-10-08T21:20:42+5:30
Nagpur University, Online Exam राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे परीक्षा देता आली नाही. परंतु कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले त्यांची ‘ऑनलाईन’च फेरपरीक्षा घ्यायची की ‘ऑफलाईन’ परीक्षेसाठी त्यांना बोलवायचे यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठातर्फेसांगण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे परीक्षा देता आली नाही. परंतु कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले त्यांची ‘ऑनलाईन’च फेरपरीक्षा घ्यायची की ‘ऑफलाईन’ परीक्षेसाठी त्यांना बोलवायचे यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठातर्फेसांगण्यात आले आहे. इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठाची परीक्षा ही बऱ्यापैकी सुरळीत पार पडली आहे. त्यामुळे ‘सोशल मीडिया’वर पूर्ण परीक्षाच ‘फ्लॉप’ झाल्याच्या अफवा चुकीच्या असल्याचा दावा परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफु ल्ल साबळे यांनी केला.
मुंबई विद्यापीठासह राज्यातील चार विद्यापीठांतील ऑनलाईन परीक्षा पहिल्या दिवशी सर्व्हरच्या समस्यांचा सामना करावा लागला. गोंडवाना विद्यापीठाला तर पेपरच रद्द करावा लागला. दुपारी दीड वाजतापासूनच्या टप्प्यात नागपूर विद्यापीठात जास्त समस्या जाणवल्या. यात वेळेवर ‘ओटीपी’ न मिळणे हा सर्वात मोठा मुद्दा होता. त्यामुळे विद्यार्थी तणावात आले. मात्र सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होईल, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.
यामुळे झाला गोंधळ
अनेक विद्यार्थ्यांनी वेळेवर ’ओटीपी’ मिळाला नसल्याची तक्रार केली. तांत्रिकदृष्ट्या ‘युझरनेम’ व ‘पासवर्ड’ टाकल्यानंतर लगेच ‘ओटीपी’ येईल अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. ‘ओटीपी’ येण्यासाठी त्यांनी पाच मिनिटांची प्रतिक्षा केली नाही आणि परत ‘हिट्स’ केल्या. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पाच-सहा ‘ओटीपी’ ‘जनरेट’ झाले. त्या कालावधीत सुमारे ८ हजार ‘एसएमएस’ तयार झाले. त्यांच्या ‘डिलिव्हरी’साठी काही वेळ गेला व त्यात विद्यार्थी ‘पॅनिक’ झाले, असे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दे़ऊ नका
पहिल्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर प्राधिकरण सदस्यांनी विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देऊ नका अशी मागणी केली आहे. विद्यापीठाने कमी वेळेत ‘अॅप’ तयार केले आहे. एखादा प्रयोग करताना अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठाने घ्यावी व तांत्रिक त्रुटी दूर कराव्या असे प्रतिपादन विधिसभा सदस्य अॅड.मनमोहन बाजपेयी यांनी केले.