मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाचे दार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:55 PM2018-01-05T23:55:10+5:302018-01-05T23:56:15+5:30

देशाच्या विविध मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘एनरोलमेंट’ नंबर देणे बंद झाल्याने प्रवेशासाठी लागणारे स्थलांतरण प्रमाणपत्र व ‘ट्रान्सफर सर्टिफिकेट’ (टीसी) मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दार तूर्तास तरी बंद आहे.

Nagpur University closed the door for the Open University students | मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाचे दार बंद

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाचे दार बंद

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात : टीसी व स्थलांतरण प्रमाणपत्राचे दिले जात आहे कारण

आॅनलाईन लोकमत
नागपूर : देशाच्या विविध मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘एनरोलमेंट’ नंबर देणे बंद झाल्याने प्रवेशासाठी लागणारे स्थलांतरण प्रमाणपत्र व ‘ट्रान्सफर सर्टिफिकेट’ (टीसी) मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दार तूर्तास तरी बंद आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी ‘डिस्टेंस एज्युकेशन’च्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करीत असल्याने मुक्त विद्यापीठ हे दोन्ही प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देत नाही.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीच्या आधारे परीक्षा विभागाच्या या अघोषित नियमांमुळे नागपूर विद्यापीठाचा शैक्षणिक विभाग व संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश अधांतरीत आहेत. यातच ‘एनरोलमेंट’ नंबर मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाची खात्री नाही. यामुळे विद्यार्थी वर्गात बसू शकत नाही आणि परीक्षाही देऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांचे दाखले व शुल्काचे पैसे कॉलेज आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात फसले आहेत. ‘एनरोलमेंट’ नंबर नसल्याने विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून परीक्षा विभागापासून ते शैक्षणिक विभाग व महाविद्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. परंतु परीक्षा विभागाने या निवेदनलाच कचरापेटी दाखविली. विद्यार्थ्यांच्या या समस्येचे निराकरण करण्यापेक्षा परीक्षा विभाग मौन धारण करून आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या संदर्भात परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी म्हणाले, या संदर्भातील एकही प्रकरण आले नाही. शनिवारी या संबंधित विभागाला याची माहिती विचारण्यात येईल.
अधिकाऱ्यांना नियमांची माहिती नाही
विद्यापीठ परीक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यां मध्ये परीक्षा व ‘एनरोलमेंट’ नंबरशी जुळलेल्या नियमांच्या माहितीचा अभाव आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ही समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे. सूत्रानुसार, मुक्त विद्यापीठाकडून नागपूर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात राज्य सरकारचे दिशानिर्देश आहेत.

Web Title: Nagpur University closed the door for the Open University students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.