नागपूर विद्यापीठ : वाचन प्रेरणा दिनाकडे महाविद्यालयांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 08:38 PM2018-10-15T20:38:36+5:302018-10-15T20:39:24+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. सोमवारी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण्याच्या अक्षताच दाखविल्या. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करणे तर सोडाच विद्यार्थ्यांना माहिती देण्याची तसदीदेखील घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात अगोदरच विद्यार्थी वाचनापासून दुरावत आहेत. अशास्थितीत महाविद्यालयांच्या अशा धोरणामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. सोमवारी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण्याच्या अक्षताच दाखविल्या. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करणे तर सोडाच विद्यार्थ्यांना माहिती देण्याची तसदीदेखील घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात अगोदरच विद्यार्थी वाचनापासून दुरावत आहेत. अशास्थितीत महाविद्यालयांच्या अशा धोरणामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१५ आॅक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळावी व त्यांच्यात वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. यासंदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनुसार नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र पाठवून कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत कळविले होते. वाचनाच्या अनुषंगाने व्याख्याने, चर्चासत्रे, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र बहुतांश महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केले. यंदा तर महाविद्यालयांकडे उपक्रम राबविण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होता. परंतु महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचादेखील निरुत्साह दिसून आला. काही महाविद्यालयांनी उपक्रमांचे आयोजन केले. मात्र बहुतांश ठिकाणी तर याचा विसरच पडल्याचे चित्र होते. काही महाविद्यालयांत तर वाचनालयांमध्ये केवळ फोटो काढण्यापुरते विद्यार्थी एकत्रित करण्यात आले व औपचारिकता पाळण्यात आली. अनेक ठिकाणी तर याबाबत सूचना फलकावर साधी सूचना लावण्याचीदेखील तसदी घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
ग्रंथालयात आयोजन, विभागांमध्ये उदासीनता
नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्येदेखील वाचन प्रेरणा दिनाबाबत उदासीनताच दिसून आली. विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मधील ग्रंथालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व याला विद्यापीठाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. मात्र काही पदव्युत्तर विभाग सोडले तर इतर ठिकाणी वाचनाच्या नावाने बोंबच होती. अनेक ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षेअगोदरचे ‘सबमिशन’ सुरू आहेत. त्याच्या चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत असताना वाचनाची प्रेरणा मात्र कुठेतरी हरवून गेली. विद्यापीठात दिव्याखालीच अंधार असल्याचे दुर्दैवी चित्र होते.
महाविद्यालयांनी पुढाकार घेणे अपेक्षित
आम्ही महाविद्यालयांना पत्राच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिवसाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत कळविले होते. खरे तर वाचनसंस्कृती वाढविली गेली पाहिजे. यात महाविद्यालयांकडून पुढाकार घेणे अपेक्षित आहे. नेमक्या किती महाविद्यालयांनी कार्यक्रमाचे आयोजन केले हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल, असे कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी सांगितले.