नागपूर विद्यापीठ : यंदा महाविद्यालये शुल्कवाढ करू शकणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:27 PM2020-07-06T22:27:21+5:302020-07-06T22:28:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिकणाऱ्या व यंदाच्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये कुठल्याही प्रकारे शुल्कवाढ करू शकणार नाहीत. ‘कोरोना’मुळे अनेकांंना आर्थिक फटका बसला आहे. हीच बाब लक्षात घेता विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेच संबंधित प्रस्ताव संमत केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिकणाऱ्या व यंदाच्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये कुठल्याही प्रकारे शुल्कवाढ करू शकणार नाहीत. ‘कोरोना’मुळे अनेकांंना आर्थिक फटका बसला आहे. हीच बाब लक्षात घेता विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेच संबंधित प्रस्ताव संमत केला आहे.
‘कोरोना’मुळे अनेक व्यवसाय अद्यापही बंद आहेत. खासगी क्षेत्राला मोठा फटका बसला असून, अनेकांच्या मिळकतीवरदेखील प्रचंड परिणाम झाला आहे. अशास्थितीत महाविद्यालयांनी यावर्षी कुठल्याही प्रकारे शुल्कवाढ करू नये, अशी विनंती करणारे पत्र ‘नुटा’तर्फे (नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन) मे महिन्यात विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले होते. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांनीदेखील प्रभारी कुलगुरूंकडे हा विषय लावून धरला होता. अद्यापपर्यंत प्रवेशाबाबत कुठलाही अंतिम निर्णय झाला नसला तरी महाविद्यालयांकडून शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता होती.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढ न करण्यासंदर्भात प्रशासनाकडूनच प्रस्ताव मांडण्यात आला. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ‘कोरोना’मुळे प्रचंड परिणाम झाला आहे. अशास्थितीत शुल्कवाढ झाली तर अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, शिवाय शुल्कवाढीमुळे संपूर्ण कुटुंबावर ताण येईल. पालकांसमोर हे मोठे आव्हान होते. त्यामुळे शुल्कवाढ नकोच, असे या प्रस्तावात नमूद होते. व्यवस्थापन परिषद सदस्यांना या प्रस्तावाला समर्थन दिले. या शैक्षणिक सत्रात कुठल्याही महाविद्यालयाने शुल्कवाढ करण्यात येऊ नये, असा निर्णय यात घेण्यात आला.
हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची सूट
व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार ठराविक मुदतीमध्ये एखादा विद्यार्थी शुल्क भरू शकला नाही तर त्याचा प्रवेश रद्द करता येणार नाही. संपूर्ण शुल्क एकत्रितपणे न भरता हप्त्यांमध्ये ते भरण्याची सूट महाविद्यालयांना द्यावी लागणार आहे. यासंदर्भात लवकरच प्रशासनाकडून परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे.