नागपूर विद्यापीठ : ‘दीक्षांत’चा मुहूर्त पुढल्या वर्षीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:20 AM2018-11-14T10:20:39+5:302018-11-14T10:21:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०६ व्या दीक्षांत समारंभाच्या आयोजनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र वेळेत अतिथी मिळाले नसल्याने तारीख निश्चित झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०६ व्या दीक्षांत समारंभाच्या आयोजनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र वेळेत अतिथी मिळाले नसल्याने तारीख निश्चित झाली नाही. तसेच आता विविध तांत्रिक कारणांमुळे विद्यापीठाला थेट पुढील वर्षी जानेवारीतच हा दीक्षांत समारंभ आयोजित करावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या २०१८ च्या उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. फेरमूल्यांकनाचे बहुतांश निकालदेखील जाहीर झाले आहेत. हिवाळी परीक्षा आॅक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. साधारणत: नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर चर्चादेखील झाली. दीक्षांत समारंभाला उद्योगपती रतन टाटा किंवा मुकेश अंबानी यांना बोलविण्याचा मानस कुलगुरूंनी व्यक्त केला होता. यानुसार त्यांच्याशी संपर्कदेखील साधण्यात आला. मात्र दोघांनीही येण्यासाठी असमर्थता दर्शविली. अशा स्थितीत आता बिगर राजकीय मान्यवरांपैकी कुणाला आमंत्रित करावे, याबाबत विद्यापीठात मंथन सुरू आहे.
दरम्यान, दीक्षांत समारंभ नेमका कधी होणार याबाबत विद्यापीठ वर्तुळातदेखील प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
परंतु अतिथी ठरले नसल्यामुळे तिथी निश्चित झालेली नाही. तारीख निश्चित झाल्यानंतर राज्यपालांकडून त्यासंदर्भात मान्यता घ्यावी लागते. याला कमीत कमी १५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आयोजन अशक्यच आहे. डिसेंबर महिन्यात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे विदेशात जाणार आहेत. त्यामुळे त्या महिन्यातदेखील आयोजन करता येणार नाही. अशा स्थितीत विद्यापीठाला २०१९ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच दीक्षांत समारंभाचे आयोजन करावे लागणार आहे. याबाबत कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. दोन दिवसात अतिथींची नावे निश्चित होतील. त्यानंतर राज्यपालांच्या मान्यतेला वेळ लागेल. डिसेंबर महिन्यात मी खासगी कामाने अमेरिकेला जाणार असल्याने सुटीवर आहे. अशा स्थितीत आम्ही जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच दीक्षांत समारंभाचे आयोजन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.