नागपूर विद्यापीठ; ‘कोरोना’मुळे शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:50 PM2020-03-30T15:50:18+5:302020-03-30T15:50:46+5:30
‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत पुढे ढकललेल्या परीक्षा व नियमित परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर निकालदेखील उशीरा येतील. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपूर विद्यापीठाने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साधारणत: एक लाख विद्यार्थ्यांच्या १८७ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. १ एप्रिलपासूनचे पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार होते. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठ ा टप्पा सुरू होणार होता.. सुमारे २८३परीक्षांना २ लाख १० हजार विद्यार्थी बसणार होते . त्यात बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी. ई., एम.टेक. (पुर वणी) व एम.ए. यांसारख्या प्रमुख व नियमित परीक्षांचा समावेश होता. आता विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. आतापर्यंत एकूण विद्यापीठाने साधारणत: साडेचारशेहून परीक्षा पुढे ढकलल्या असून यात ३ लाख विद्यार्थी सहभागी होणार होते.
जर १४ एप्रिलपर्यंत परिस्थिती सुरळीत झाली व ‘लॉकडाऊन’ उठला तरी विद्यापीठाला त्वरित परीक्षा आयोजित करता येणार नाहीत. साधारणत: २३ ते २५ एप्रिलपासूनच परीक्षा घेता येतील. दरवर्षी विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलैपर्यंत चालतात. यंदा त्या जूनपर्यंतच होणार होत्या. त्यामुळे विद्यापीठाकडे एक महिन्याचा ‘बफर’ वेळ होता. परंतु ‘कोरोना’मुळे आता परीक्षा उशीरापर्यंच चालतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मूल्यांकन व पर्यायाने निकालांनादेखील उशीर होईल.
विद्यापीठाच्या ‘अॅकेडॅमिक कॅलेंडर’नुसार शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात होते. तर जुलैमध्ये प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशांना सुरुवात होते. मात्र निकाल उशीरा लागले तर प्रवेशप्रक्रियादेखील लांबेल. अशा स्थितीत त्याचा फटका हिवाळी परीक्षांना बसू शकतो. त्यामुळे संपूर्ण ‘अॅकेडॅमिक कॅलेंडर’ कोलमडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
मूल्यांकन वेगाने पार पाडण्यावर भर
उन्हाळी परीक्षा नेमक्या कधी सुरू होतील हे सर्व ‘लॉकडाऊन’ कधी उठेल यावर अवलंबून आहे. जर १४ एप्रिलला ‘लॉकडाऊन’ उठला तरी लगेच परीक्षा सुरू करणे शक्य नाही. एकूण प्रक्रियेला आठवडाभर वेळ लागेल व २५ एप्रिलनंतरच परीक्षा घेता येतील. मूल्यांकन जास्तीत जास्त वेगाने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न असेल असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.