दादासाहेबांच्या स्मृतिदिनाला नागपूर विद्यापीठाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:42 PM2018-07-20T23:42:50+5:302018-07-20T23:45:37+5:30
वंचित आणि शोषित समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दिवंगत माजी कुलगुरु दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २९ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला यंदा विद्यापीठ प्रशासनाने नकार दर्शविला आहे. त्यामुळे गत २० वर्षांपासून होणाऱ्या या वैभवशाली परंपरेत खंड पडणार असल्याने दादासाहेब काळमेघ यांच्या चाहत्यात सध्या नाराजीचा सूर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंचित आणि शोषित समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दिवंगत माजी कुलगुरु दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २९ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला यंदा विद्यापीठ प्रशासनाने नकार दर्शविला आहे. त्यामुळे गत २० वर्षांपासून होणाऱ्या या वैभवशाली परंपरेत खंड पडणार असल्याने दादासाहेब काळमेघ यांच्या चाहत्यात सध्या नाराजीचा सूर आहे.
विद्यापीठात स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र यंदापासून विद्यापीठ प्रशासनाने दीक्षांत सभागृह केवळ विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठीच उपलब्ध होईल, असे कारण देत स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानची विनंती अमान्य केली आहे. दादासाहेबांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी २९ जुलै रोजी विद्यापीठाने भाडेतत्त्वावर तीन तासांसाठी दीक्षांत सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ यांनी केली होती. मात्र प्रशासकीय कारण देत ती अमान्य करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयावरून श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविले आहे. यात त्यांनी दादासाहेब काळमेघ यांचे कर्तृत्व केवळ नागपूर विद्यापीठापुरते मर्यादित नसून त्यांनी कर्तृत्वाच्या बळावर अवघ्या महाराष्ट्रात स्वत:चा ठसा उमटविला होता. फुले, शाहू, डॉ.आंबेडकर, डॉ.पंजाबराव देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांत खऱ्या अर्थाने रुजविणारे दादासाहेब विद्यापीठाचे कुणीच नव्हते का, अशी विचारणा केली आहे. दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रमासाठी दीक्षांत सभागृहाची परवानगी नाकारल्याने विद्यापीठाची जनमानसात प्रतिमा उंचावले का, असा प्रश्नही देशमुख यांनी तावडे यांना केला आहे. इकडे प्रतिष्ठानच्य वतीने कार्यक्रमासाठी ९ जुलै या कार्यक्रमासाठी अर्ज केला होता. यानंतर विद्यापीठाने १३ जुलै रोजी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत दीक्षांत सभागृह केवळ विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दादासाहेब अखेरच्या श्वासापर्यंत गरिबांसाठी झटले. त्यांनी वंचितांना जगण्याचा मार्ग दाखविला. विद्यापीठाने कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे पत्र मिळाले. आता दादासाहेबांचा विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहातून फोटो कधी हटवितात याची वाट बघतो आहे. या कार्यक्रमाला विद्यापीठाने परवानगी नाकारली असली तरी दादासाहेबांच्या हजारो चाहत्यांच्या आग्रहास्तव नागपुरात कार्यक्रम होईलच. यात कुणीही शंका ठेवण्याचे कारण नाही.
हेमंत काळमेघ
सचिव, स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान