नागपूर विद्यापीठ : ठरलं ! १८ जानेवारी रोजी दीक्षांत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:41 AM2019-12-11T00:41:46+5:302019-12-11T00:42:53+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. या समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे उपस्थित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. या समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सहमतीनंतरच १८ जानेवारी रोजी दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूर विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. फेरमूल्यांकनाचे निकाल मोठ्या प्रमाणात जाहीर झाले आहेत. हिवाळी परीक्षा ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न होता. त्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांना निमंत्रित करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला आहे. त्यानुसार कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवले आहे. न्या. बोबडे यांनी १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कोणत्याही तारखेला मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु सरन्यायाधीशांना त्या तारखांना नागपुरात येणे शक्य नव्हते. त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्याच सोयीने वेळ मागितली. त्यांच्याकडून अखेर निश्चिती आली व १८ जानेवारी रोजी त्यांनी वेळ दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. १८ जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. या कार्यक्रमाला राज्यपालदेखील अपेक्षित होते. परंतु त्याच दिवशी मुंबईत ‘एसएनडीटी’ विद्यापीठाचादेखील दीक्षांत समारंभ आहे. त्यामुळे ते येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
सुरेश भट सभागृहात आयोजन
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीक्षांत समारंभाला येणार असल्यामुळे मान्यवरांचीदेखील उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने हे आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.