नागपूर विद्यापीठ :आजपासून ‘पेट’चे दुहेरी आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:45 AM2018-01-17T00:45:22+5:302018-01-17T00:46:09+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) बुधवारपासून सुरुवात होणार आहे. दोन हजारांहून अधिक परीक्षार्थी ‘पेट’ देणार असून, यात सहा ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) बुधवारपासून सुरुवात होणार आहे. दोन हजारांहून अधिक परीक्षार्थी ‘पेट’ देणार असून, यात सहा ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. यंदापासून ‘पेट’च्या नकारात्मक गुणांचे आव्हान वाढले असून, दोन चुकीच्या उत्तरांसाठी एक गुण कापण्यात येणार आहे. त्यामुळे ‘पीएचडी’ नोंदणीसाठी इच्छुक असलेल्यांसमोरील आव्हानात वाढ झाली आहे.
विद्यापीठाकडे ‘पेट’साठी ३ हजार ३८१ आॅनलाईन अर्ज सादर झाले होते. यापैकी २ हजार १८५ उमेदवार ‘आॅनलाईन’ परीक्षेसाठी पात्र ठरले. विद्यापीठाने आॅनलाईन परीक्षेसाठी एकूण सात ‘बॅच’ केल्या आहेत. सहा ‘बॅच’मध्ये एकाच वेळी प्रत्येक ३५० उमेदवार परीक्षा देतील तर सातव्या ‘बॅच’मध्ये ८१ परीक्षार्थी राहतील. ज्येष्ठ नागरिकांची मात्र ‘आॅफलाईन’ परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार विद्यापीठानेही 'पेट'च्या नियमावलीत काही बदल केले आहेत. 'पेट' यंदा आॅनलाईन आणि लेखी अशा दोन स्तरावर होणार आहे. त्यानुसार दोन पेपर होतील. यात पहिला पेपर हा १०० गुणांचा असून 'अॅप्टीट्यूड टेस्ट' पद्धतीचा असेल तर दुसरा पेपर हा विषयनिहाय आणि लेखी पद्धतीने घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेमध्ये स्वतंत्ररीत्या ५० टक्के घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी ही मर्यादा ४५ गुणांची राहणार आहे. ‘पेट’ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’करिता नोंदणी करण्यासाठी तीन वर्षांची मर्यादा दिली आहे. या तीन वर्षांत नोंदणी न केल्यास त्याला पुन्हा 'पेट' द्यावी लागणार आहे.