नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 07:40 PM2020-09-29T19:40:27+5:302020-09-29T19:41:54+5:30
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. २४ सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू झाले होते व मागण्या पूर्ण न झाल्यास १ ऑक्टोबरपासून पूर्ण काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. २४ सप्टेंबरला कर्मचारी कामावर आले. मात्र, ते स्वाक्षरी करून आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित जमले. नागपूर विद्यापीठाच्या महाराज बागसमोरील परिसरासह कॅम्पससमोरदेखील हे आंदोलन करण्यात आले. सर्वच कर्मचारी व अधिकारी संघटना यात सहभागी झाल्या आहेत. कृती समितीच्या सदस्यांची उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चादेखील झाली व मंत्र्यांनी मागण्या पूर्ण होतील असे आश्वासनदेखील दिले. मात्र याअगोदरदेखील असेच आश्वासन मिळाले होते. त्यामुळे जोपर्यंत शासननिर्णय जारी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका समितीने घेतली. त्यानुसार आंदोलन अद्यापही सुरूच आहे. १ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी ही प्रमुख मागणी आहे. १ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन केले आहे. अशा स्थितीत आंदोलनामुळे महत्त्वाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे.