नागपूर विद्यापीठ; ‘पीएचडी वायव्हा’ची संपूर्ण प्रक्रियाच ‘ऑनलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:36 PM2020-06-17T12:36:05+5:302020-06-17T12:39:41+5:30
‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे २०० हून अधिक संशोधकांच्या शोधप्रबंधाच्या मूल्यांकनाचे अहवाल आले होते. एकूणच स्थिती लक्षात घेता, ‘ऑनलाईन वायव्हा’ घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘पीएचडी’च्या ‘वायव्हा’ अर्थात मौखिक परीक्षांसंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. मौखिक परीक्षेची संपूर्ण प्रक्रियाच ‘ऑनलाईन’ राहणार आहे. तज्ज्ञांकडून वेळ घेण्यापासून ते त्यांच्याकडून परीक्षेचा अहवाल घेण्यापर्यंतचे संपूर्ण टप्पे ‘ऑनलाईन’ माध्यमातून होणार आहेत. यासाठी विशेष ‘सॉफ्टवेअर’चीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. केवळ ‘कोरोना’चे संकट असेपर्यंतच नव्हे तर पुढेदेखील हा प्रयोग चालू ठेवण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पुढील आठवड्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
‘कोरोना’मुळे विद्यापीठाने ‘वायव्हा’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला व १६ मार्चपासूनचे सर्व ‘वायव्हा’ पुढे ढकलण्यात आले. परंतु विद्यापीठाकडे २०० हून अधिक संशोधकांच्या शोधप्रबंधाच्या मूल्यांकनाचे अहवाल आले होते. एकूणच स्थिती लक्षात घेता, ‘ऑनलाईन वायव्हा’ घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी विद्यापीठाने समितीदेखील गठित केली होती. यासंदर्भातील रूपरेषा जवळपास अंतिम झाली आहे. ‘ऑनलाईन मिटिंग प्लॅटफॉर्म’वर प्रत्यक्ष ‘वायव्हा’ होणार आहे. तज्ज्ञ देशात कुठेही बसून संशोधकांना प्रश्न विचारू शकणार आहेत. शिवाय ‘ओपन डिफेन्स वायव्हा’ असल्याने इतरही लोक त्यात सहभागी होऊ शकणार आहे. उमेदवाराला मात्र संंंबंधित संशोधन केंद्रावरूनच सादरीकरण करावे लागणार आहे. नेमक्या कुठल्या ‘अॅप’च्या माध्यमातून ही परीक्षा होईल याचा निर्णय बुधवारी होणार आहे. यासंदर्भात दोन ते तीन कंपन्यांच्या प्रतिनिधींना सादरीकरणासाठी बोलविण्यात आले आहे. दरम्यान, मौखिक परीक्षेसाठी तज्ज्ञांची वेळ घेणे, त्यांना सगळ्या मूल्यांकनकर्त्यांचे अहवाल पाठविणे इत्यादी प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्यासाठी विद्यापीठाने ‘सॉफ्टवेअर’ बनविले आहे. तज्ज्ञांना ‘ई-मेल’वरच ‘सॉफ्टवेअर’ची ‘लिंक’ व ‘पासवर्ड’ जाईल. त्यानंतर ते तेथेच सर्व अहवालदेखील पाहू शकतील. शिवाय परीक्षा झाल्यानंतर त्यांचे अभिप्राय व निर्णयदेखील तातडीने त्याच माध्यमातून कळवू शकणार आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रियेला गती येणार आहे.
पदव्युत्तर परीक्षांसाठीदेखील वापर करणार
केवळ ‘कोरोना’चा काळच नव्हे तर संबंधित ‘सॉफ्टवेअर’ पुढेदेखील वापरण्यात येणार आहे. ज्या तज्ज्ञांना नागपुरात येणे शक्य होणार नाही, त्या प्रकरणात ‘ऑनलाईन वायव्हा’ होतील. शिवाय ‘एमफार्म’, ‘एमटेक’च्या ‘डेझर्टेशन’साठीदेखील याचा वापर करू, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.