नागपूर विद्यापीठ : उत्तरपत्रिका घेऊन विद्यार्थिनीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:09 PM2018-11-21T13:09:25+5:302018-11-21T13:09:49+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान एक विद्यार्थिनी चक्क परीक्षा केंद्रातील उत्तरपत्रिका घेऊनच गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान एक विद्यार्थिनी चक्क परीक्षा केंद्रातील उत्तरपत्रिका घेऊनच गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेनंतर केंद्र व परीक्षा विभागात खळबळ उडाली आहे. उत्तर पत्रिका परत मिळविण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी वसंतराव नाईक शासकीय समाजविज्ञान संस्थेत घडली. या केंद्रावर पेपर देण्यासाठी पोहोचलेल्या विद्यार्थिनीने अगोदर संपूर्ण पेपर सोडविला. मात्र वेळ संपल्यानंतर तिने पेपर पर्यवेक्षकांना सोपविलाच नाही. नियमानुसार कक्षाचे पर्यवेक्षक प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जाऊन उत्तरपत्रिका घेतात. त्यानंतर त्यांची मोजणी होते व नंतरच सर्व परीक्षार्थ्यांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येते. मात्र असे असतानादेखील संबंधित विद्यार्थिनी परीक्षा केंद्रातून उत्तरपत्रिका बाहेर कशी घेऊन गेली हा प्रश्न कायम आहे. याचे उत्तर देण्याचे परीक्षा विभाग तसेच परीक्षा केंद्रावरील कर्मचारी टाळत आहेत. या घटनेची माहिती इतरांना होऊ नये यासाठी गुपचूपपणे हे प्रकरण शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात आले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग व परीक्षा केंद्र अधिकाºयांशी संपर्क केला असता दोघांनीही घटनेला दुजोरा दिला. मात्र अधिक माहिती देण्याचे टाळले. आम्ही कुठलीही माहिती देऊ शकत नाही, असे केंद्र अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी घटना झाल्याचे मान्य केले. मात्र सुटीवर असल्याने जास्त माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
परत मिळाली उत्तरपत्रिका
दरम्यान घटनेची माहिती मिळताच संबंधित विद्यार्थिनीशी संपर्क करण्यात आला व तिला परीक्षा केंद्रावर परत बोलविण्यात आले. अगोदर तिने उत्तरपत्रिका नेलीच नाही, असा पवित्रा घेतला. मात्र कारवाईचा धाक दाखविताच तिने आपली चूक मान्य केली व उत्तरपत्रिका परत केली.
केंद्र अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी
याप्रकरणाची चौकशी शिस्तपालन समितीकडून करण्यात येईल, असे डॉ.नीरज खटी यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन होणार नाही. शिस्तपालन समितीच्या निर्णयानंतरच उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करायचे की नाही, हे ठरविण्यात येईल व केंद्र अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीदेखील चौकशी होईल, असे त्यांनी सांगितले.