नागपूर विद्यापीठ : ऐन परीक्षेअगोदर बदलला ‘बी.कॉम’चा अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:31 AM2019-01-29T11:31:29+5:302019-01-29T11:31:58+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाने बीकॉमच्या सहाव्या सत्रातील अप्रत्यक्ष कर या विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाने बीकॉमच्या सहाव्या सत्रातील अप्रत्यक्ष कर या विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे.
हा अभ्यासक्रम याच सत्रापासून तत्काळ प्रभावाने लागू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना आता नव्या अभ्यासक्रमाच्या हिशेबाने तयारी करावी लागणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम बदलल्याची कुठलीही माहिती नाही. अशास्थितीत विद्यार्थी परीक्षा कशी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळाने नवीन अभ्यासक्रमाची शिफारस केली होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी विशेषाधिकारात याला २३ जानेवारी रोजी मंजुरी दिली; सोबतच हा अभ्यासक्रम तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देशदेखील दिले. या अभ्यासक्रमाच्या आधारेच संबंधित विषयाच्या शिक्षकांना प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. कारण वर्गात विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच शिकविण्यात आले आहे.
यामुळे विद्यार्थीदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. केंद्र शासनाने २०१७ मध्ये ‘जीएसटी’ लागू केला. नवीन कर प्रणाली लागू झाल्यानंतर दीड वर्ष विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदलासाठी कुठलाही पुढाकार घेतला नव्हता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत दोन दिवसाच्या आत अभ्यासक्रम तयार केला. याला लागू करण्यासाठी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याकडे शिफारस केली होती. यासंबंधात वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. विनायक देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी व्यस्त असल्याचे कारण देत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
केवळ ‘जीएसटी’चे ‘बेसिक’च शिकविणार
लागू करण्यात आलेल्या ‘बीकॉम’च्या सहाव्या सत्रात अप्रत्यक्ष कराच्या नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ‘जीएसटी’ची अगदी ‘बेसिक’ माहिती देण्यात आली आहे. अभ्यासक्रमाचा उद्देशदेखील हाच ठेवण्यात आला आहे. पहिल्या ‘युनिट’मध्ये ‘जीएसटी’ची ओळख, दुसऱ्या ‘युनिट’मध्ये ‘जीएसटी’चे प्रकार, तिसऱ्या ‘युनिट’मध्ये ‘जीएसटी’चा भरणा तर चौथ्या ‘युनिट’मध्ये ‘कस्टम्स अॅक्ट’चा समावेश करण्यात आला आहे..