नागपूर विद्यापीठ : २० मेशिवाय परीक्षा अशक्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:06 AM2020-04-15T00:06:49+5:302020-04-15T00:09:41+5:30
साधारणत: २० मेनंतरच परीक्षांचे आयोजन करता येणार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने नेमलेली समिती नेमका काय अहवाल सादर करते, याकडे संपूर्ण विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ३० एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशात ३ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार आहे. त्यानंतर स्थिती सुरळीत झाली व ‘लॉकडाऊन’ हटला तरी विद्यापीठाला लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. साधारणत: २० मेनंतरच परीक्षांचे आयोजन करता येणार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने नेमलेली समिती नेमका काय अहवाल सादर करते, याकडे संपूर्ण विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशानंतर नागपूर विद्यापीठाने सर्वात प्रथम ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठा टप्पा सुरू होणार होता. २८ मार्च रोजी विद्यापीठाने त्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले. ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलपर्यंत राहील व त्यानंतर स्थिती सामान्य होईल असा अंदाज होता, परंतु तसे होऊ शकले नाही. महाराष्ट्र शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या पत्रानुसार विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने आतापर्यंत साधारणत: ७०० हून अधिक परीक्षा पुढे ढकलल्या असून, यात पावणेचार लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार होते. आतापर्यंत जवळपास ८० टक्के परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
जर ३ मेनंतर ‘लॉकडाऊन’ उठले तरी विद्यापीठाला लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. सर्व परीक्षांचे परत नियोजन करणे, पुढे ढकलल्या गेलेल्या व नियमित परीक्षांच्या वेळेचे गणित जमविणे, बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांना शहरात परत येण्यासाठी वेळ देणे, परीक्षा केंद्रांवर आवश्यक सोयी करणे, यावर विद्यापीठाला भर द्यावा लागणार आहे. हे सर्व करण्यासाठी कमीतकमी दोन आठवड्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा या २० मेनंतरच होऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘अकॅडेमिक कॅलेंडर’ कोलमडणारच
विद्यापीठाच्या ‘अकॅडेमिक कॅलेंडर’नुसार शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात होते, तर जुलैमध्ये प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशांना सुरुवात होते. मात्र निकाल उशिरा लागले तर प्रवेशप्रक्रियादेखील लांबेल. अशास्थितीत त्याचा फटका हिवाळी परीक्षांना बसू शकतो. त्यामुळे संपूर्ण ‘अकॅडेमिक कॅलेंडर’ कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
समितीच्या अहवालाकडे लक्ष
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांचा कालावधी निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील चार विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑनलाईन परीक्षा घ्याव्या की केवळ अंतिम वर्षाच्याच परीक्षा घ्याव्यात, यासंदर्भात ही समिती शिफारस करणार आहे. दरम्यान, सरकारच्या निर्देशांचे आम्ही पालन करू. अद्याप सरकारने ‘ऑनलाईन’ परीक्षांबाबत काहीही सांगितले नसल्याने आम्ही त्याची तयारी सुरू केलेली नाही. जसे निर्देश मिळतील त्या दिशेने पावले उचलू, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.