नागपूर विद्यापीठ; परीक्षार्थींना मिळाली जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका; तासभरात बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 08:00 AM2022-07-02T08:00:00+5:302022-07-02T08:00:11+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत पुन्हा गाेंधळ झाल्याचे समाेर आले. शुक्रवारी बीकाॅम चाैथ्या सेमिस्टरच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार झाला. नवीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली.
आशिष दुबे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत पुन्हा गाेंधळ झाल्याचे समाेर आले. शुक्रवारी बीकाॅम चाैथ्या सेमिस्टरच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार झाला. नवीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. धक्कादायक म्हणजे विद्यार्थी किमान तासभर तरी प्रश्नपत्रिका साेडविण्यासाठी डाेके लावत हाेते. नंतर लक्षात आले की, ही प्रश्नपत्रिकाच अभ्यासक्रमाच्या बाहेरची आहे.
आज बीकाॅम चाैथ्या सेमिस्टरच्या मराठी विषयाचा पेपर हाेता. सूत्रांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना नव्याऐवजी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. यातील सर्व प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना याबाबत माहिती दिली व संपूर्ण गाेंधळ लक्षात आला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागानेच या प्रश्नपत्रिकेची लिंक काॅलेजला पाठविली हाेती व काॅलेजने ती डाऊनलाेड केली. परीक्षा विभागाला याबाबत सूचित केल्यानंतर त्यांनी नवीन लिंक पाठविली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका साेडवायला सुरुवात केली. एक ते दीड तास हा संपूर्ण गाेंधळ चालला. सूत्रांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविण्याचे हे तिसरे प्रकरण आहे. यापूर्वी साेशल वर्कच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली हाेती.
परीक्षा विभागाची चूक नाही
याबाबत संपर्क साधला असता विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांनी ही परीक्षा विभागाची चूक नसल्याचे सांगितले. शुक्रवारी जुन्या व नव्या अशा दाेन्ही अभ्यासक्रमाचे पेपर हाेते. काही महाविद्यालयांनी नवीन अभ्यासक्रमाची लिंक ओपन करण्याऐवजी जुन्या अभ्यासक्रमाची लिंक डाऊनलाेड केल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाविद्यालयांना त्वरित नव्या अभ्यासक्रमाची लिंक पाठविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.