नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा जुलैमध्ये?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:21 AM2020-04-29T11:21:52+5:302020-04-29T11:22:12+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठाच्या ८० टक्के परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठाच्या ८० टक्के परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मंगळवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा व शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकाचा अहवाल जारी केला. यावर मंथन करण्यासाठी बुधवारी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
परीक्षा आणि शैक्षणिक वर्षासंदर्भात युजीसीच्या अंतर्गत समिती गठित करून देशपातळीवर एकच निर्णय घेण्याची भूमिका घेण्यात आली होती. युजीसीने देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकाचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार १६ ते ३१ जुलैदरम्यान परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार उर्वरित सत्र १ ते १५ जुलैदरम्यान पूर्ण करत १६ ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यासंदर्भातील सर्व निर्णय हा त्या त्या राज्य शासनांवर सोपविण्यात आला आहे. त्यावर विद्यापीठाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, राज्य शासनाकडून यावर स्पष्ट निर्देश आल्यावर नेमक्या परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. युजीसीने नवीन शैक्षणिक सत्र १ आॅगस्टपासून तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी १ सप्टेंबरपासून सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी बुधवारी परीक्षा मंडळाची बैठक असल्याचे स्पष्ट केले. युजीसीच्या अहवालाबाबत राज्य शासन काय निर्णय घेईल त्यावर पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.