नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 10:50 AM2021-02-06T10:50:53+5:302021-02-06T10:52:45+5:30

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Nagpur University exams will be held online | नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’च होणार

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’च होणार

Next
ठळक मुद्देविद्यापीठाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त विकास समितीची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या हिवाळी परीक्षांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय ठेवण्यात आले होते. परीक्षा कशा घ्यायचा, याचा निर्णय विद्यापीठांना घ्यायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

नागपूर विद्यापीठाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने विद्यापीठाचा कशा पद्धतीने विकास करता येईल व किती निधीची आवश्यकता लागेल यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हेदेखील त्या समितीत असतील. शतकपूर्ती वर्षादरम्यान शासनाकडून विद्यापीठाला निधी देण्यात येईल व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

कार्यक्रमाला पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह आ. नागो गाणार, आ. समीर मेघे, आ. दुष्यंत चतुर्वेदी, आ. अभिजीत वंजारी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, विभागीय सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे, सीईटी आयुक्त डॉ. चिंतामण जोशी, डॉ. शालिनी इंगोले, उपसचिव सतीश तिडके, अजित बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

दीड हजाराहून अधिक तक्रारींचे निवारण

उच्च व तंत्र मंत्रालय @ नागपूर या कार्यक्रमादरम्यान २ हजार २७२ प्रलंबित तक्रारींपैकी १ हजार ६१७ तक्रारींचे निवारण करण्यात आले. याची टक्केवारी ७१ टक्के इतकी होती. यात शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांचा समावेश होता. देशपांडे सभागृहात नोंदणी करून व ऑनलाईन पद्धतीने निवेदन स्वीकारण्यात आली होती. टोकन पद्धतीने तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.            अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबतच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये दोन नियुक्ती आदेश देण्यात आले. ३४२ प्रकरणे प्रलंबित असून ३०९ प्रकरणांत त्रुटी दिसून आल्या.

‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा

कार्यक्रमादरम्यान ‘कोरोना’संदर्भातील कुठलीही खबरदारी दिसून आली नाही. अनेक जण बिना मास्कचे आले होते. मंचावरदेखील ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाला होता. अनेक आमदार, अधिकारी एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. शिवाय संघटनांचे प्रतिनिधी घोळक्यानेच मंत्र्यांशी संवाद साधताना दिसून आले. पत्रपरिषदेच्या ठिकाणी तर पत्रकारांपेक्षा इतरांची अक्षरश: दाटीवाटीने गर्दी झाली होती. एकाही अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्याने अशा लोकांना टोकले नाही. शिक्षणाशी संबंधित विभागाच्या कार्यक्रमात असा प्रकार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

Web Title: Nagpur University exams will be held online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.