नागपूर विद्यापीठ; न्यायालयीन प्रकरणांवर ८१ लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:24 AM2020-11-09T10:24:09+5:302020-11-09T10:24:31+5:30
Nagpur News Nagpur University मागील चार वर्षांत नागपूर विद्यापीठाविरोधात ५०० हून अधिक लोकांनी न्यायालयात धाव घेतली व ५२९ खटले दाखल केले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि विविध वाद यांची नेहमीच परंपरा राहिली आहे. विद्यापीठाच्या कारभारविरोधात अनेकदा विद्यार्थी, संशोधक नाराज असल्याचे दिसून येते. मागील चार वर्षांत विद्यापीठाविरोधात ५०० हून अधिक लोकांनी न्यायालयात धाव घेतली व ५२९ खटले दाखल केले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत नागपूर विद्यापीठाविरोधात किती खटले दाखल झाले, नागपूर विद्यापीठाने किती खटले दाखल केले, खटल्यांवर विद्यापीठाचा किती खर्च झाला इत्यादी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१७ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत नागपूर विद्यापीठाविरोधात एकूण ५२९ खटले दाखल झाले. यातील २४ खटले तर कर्मचाऱ्यांनीच दाखल केले आहेत. विद्यापीठाने मात्र एकाही कर्मचाऱ्याविरोधात न्यायालयात धाव घेतली नाही. विविध खटले लढण्यासाठी विद्यापीठाने २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून ८१ लाख ३३ हजार ५० रुपये खर्च केले.
‘पॅनल’ असतानादेखील बाहेरील वकिलांना काम
न्यायालयीन प्रकरणे लढण्यासाठी विद्यापीठाच्या पॅनलवर एकूण ५१ वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र असे असतानादेखील विद्यापीठाने १० बाहेरील वकिलांना काम दिले. या वकिलांच्या मानधनापोटी ६ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.
‘कोरोना’काळात घटली प्रकरणे
विद्यापीठाविरोधात सर्वात जास्त १९८ खटले २०१८ या वर्षात दाखल करण्यात आले. २०१९ मध्ये खटल्यांची संख्या १४३ होती तर या वर्षी पहिल्या नऊ महिन्यात विद्यापीठाविरोधात न्यायालयामध्ये केवळ २२ प्रकरणे दाखल झाली आहेत. ‘कोरोना’तील ‘लॉकडाऊन’मुळे ही संख्या घटली असण्याची शक्यता आहे.
दाखल खटल्यांची संख्या
वर्ष - खटले
२०१७ - १६६
२०१८ - १९८
२०१९ - १४३
२०२० (सप्टेंबरपर्यंत) - २२