नागपूर विद्यापीठ; बहि:शाल विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 07:00 AM2020-12-12T07:00:00+5:302020-12-12T07:00:06+5:30
Nagpur University exam राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’ यापैकी एका माध्यमातून परीक्षा देता येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’ यापैकी एका माध्यमातून परीक्षा देता येईल. जर एखाद्या विद्यार्थ्याला दोन्ही माध्यमातून परीक्षा द्यायची असेल तर तशी सूटदेखील देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येईल.
‘कोरोना’मुळे परीक्षा लांबल्या व विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात ‘ऑनलाईन’ परीक्षा घेतल्या. आता निकालदेखील जाहीर झाले असून आमची परीक्षा कधी घेणार असा सवाल बहि:शाल विद्यार्थ्यांकडून होत आहे. यासंदर्भात विद्यापीठाने निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या २१ दिवसअगोदर वेळापत्रक देण्यात येईल. सोबतच त्यांना कुठल्या माध्यमातून परीक्षा द्यायची आहे याची माहितीदेखील एकत्रित करण्यात येईल. त्यांच्याकडून पर्याय मिळाल्यानंतर परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. परीक्षा विभागाने परीक्षेचा आराखडा तयार केला असून कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी त्याला मान्यतादेखील दिली आहे.
‘ऑनलाईन’ परीक्षांमध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेता विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ परीक्षांचादेखील पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचे ठरविले आहे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना विस्तृत प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांना ‘गुगल फॉर्म’च्या माध्यमातून पेपर देता येतील. परीक्षांसंदर्भात दोन ते तीन दिवसात सविस्तर माहिती जारी करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.