धर्मेश धवनकरांकडून अजूनही नोटीसला उत्तर नाही; प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 04:02 PM2022-11-26T16:02:36+5:302022-11-26T16:36:41+5:30
विद्यापीठ वर्तुळात चर्चा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूरविद्यापीठातील सात विभागप्रमुखांना बोगस तक्रारीची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याच्या आरोप प्रकरणात जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी वाढीव मुदत संपल्यानंतरही नोटीसला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे एकूणच या प्रकरणात विद्यापीठ प्रशासन फार गंभीर नसून हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याचाच प्रयत्न सुरू असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यापासूनच विद्यापीठ प्रशासनाने याला गांभीर्याने घेतले नाही. वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्यानंतर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी धवनकर यांना नोटीस जारी करून तीन दिवसांत खुलासा मागितला होता. ही मुदत संपली तरी धवनकर यांच्या विनंतीनुसार चार दिवसांची पुन्हा मुदत वाढवून देण्यात आली. ही मुदतही आता संपली आहे. परंतु उत्तर आलेले नाही. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, धवनकर यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही. उत्तर न आल्यास काय कारवाई करणार? असा प्रश्न त्यांना विचारला असत याबाबचा निर्णय कुलगुरू घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.
अन् प्राध्यापकाच्या पत्नीने धर्मेश धवनकरांच्या कानशिलात लगावली; व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणासाठी कुलगुरूंनी गठित केलेल्या चौकशी समितीतील एका सदस्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याबाबत डॉ. राजू हिवसे यांनी सांगितले की, या सदस्याने आपले नाव मागे घेतले आहे. त्यांच्याऐवजी कुणाला समितीत घ्यायचे याचा निर्णयसुद्धा कुलगुरूच घेतील. समितीची जबाबदारी एखाद्या वकिलाला देण्यावर विचार सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
प्रकरण दोन महिने टाळण्याचा प्रयत्न
जानेवारी २०२३ मध्ये विद्यापीठात इंडियन सायन्स काँग्रेस होणार आहे. हे एक मोठे आयोजन असून, त्यात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी हे प्रकरण सध्या थंडबस्त्यात टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे.