पहिल्याच दिवशी नागपूर विद्यापीठ ‘फेल’; परीक्षा रद्द करण्याची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 09:38 PM2021-03-25T21:38:54+5:302021-03-25T21:39:22+5:30
Nagpur news राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या पहिल्या दिवशी ढिसाळ नियोजन दिसून आले. सर्व्हरच हँग झाल्याने ऑनलाईन परीक्षाच होऊ शकली नाही. विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करून अक्षरशः थकून गेले होते. मात्र पेपर सुरू होऊ शकले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या पहिल्या दिवशी ढिसाळ नियोजन दिसून आले. सर्व्हरच हँग झाल्याने ऑनलाईन परीक्षाच होऊ शकली नाही. विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करून अक्षरशः थकून गेले होते. मात्र पेपर सुरू होऊ शकले नाही. अखेर दुपारी विद्यापीठाने तांत्रिक चूक असल्याचे मान्य करत २५ मार्च रोजीचे सर्व पेपर रद्द झाल्याची घोषणा केली. आता हे पेपर कधी होतील याबाबत विद्यापीठाने काहीही स्पष्ट केलेले नाही.
यंदा विद्यापीठाने वेबबेस्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी परीक्षेचा पहिलाच दिवस होता. पहिल्या टप्प्यात बीकॉम, बीएस्सी, बीई, बीबीए इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना एका तासाच्या कालावधीत ४० प्रश्न सोडवायचे होते. ८ ते ११ या कालावधीत पहिल्या सत्रातील विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार होते. सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पेपर सुरूच होऊ शकला नाही. सर्व्हर एरर इन अप्लिकेशन असे स्क्रीनवर लिहून येत होते. विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर थोड्या वेळात परीक्षा सुरू होईल, असे त्यांना सांगण्यात येत होते. मात्र दुपारपर्यंत पेपर सुरू होऊ शकले नाही. दुपारच्या सत्रातदेखील हीच स्थिती होती. अखेर विद्यापीठाने गुरुवारचे सर्व पेपर रद्द करण्याची घोषणा केली. यासंदर्भातील नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.
हेल्पलाईनवर रिस्पॉन्स नाही
सकाळपासून पेपर उघडत नसल्याने विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर संपर्क साधण्यास सुरुवात केली. मात्र हेल्पलाईन सातत्याने बिझी येत होती. रिस्पॉन्स मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते.
फोटोचे दिले कारण
अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून संदेश गेले की, फोटो योग्य पद्धतीने कॅप्चर न झाल्यामुळे हा घोळ झाला. मात्र फोटो कॅप्चर न होणे व विद्यापीठाच्या सर्व्हरची काय लिंक आहे, हे कुणीही सांगितले नाही.
‘वेबबेस्ड’चा पहिलाच प्रयोग
उन्हाळी परीक्षा ‘अॅप’च्या माध्यमातून झाल्या होत्या. सुरुवातीला त्यात काही प्रमाणात गोंधळ झाला होता. मात्र त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. ‘कोरोना’मुळे ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने ‘अॅप’ऐवजी ‘वेबबेस्ड’ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठातील हा असा प्रथमच प्रयोग होता. आश्चर्याची बाब म्हणजे यासंदर्भातील कंपनी विद्यापीठाने ऐनवेळी नेमली. कमी कालावधीत नियोजन कसे होणार, हा प्रश्न तेव्हाच उपस्थित करण्यात आला होता.
मॉक टेस्ट का नाही?
‘वेबबेस्ड’ परीक्षेचा प्रयोग असल्याने मॉक टेस्ट होणे आवश्यक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सराव करता आला असता. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देताच आली नाही. तेव्हा तांत्रिक अडचण दाखविण्यात येत होती.