नागपूर विद्यापीठ; अखेर विद्यार्थिनींच्या तक्रारीची राज्यपाल कार्यालयाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 07:45 AM2022-03-23T07:45:00+5:302022-03-23T07:45:02+5:30

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पीएच.डी. नोंदणी प्रक्रियेदरम्यान विद्यार्थिनींकडे पैशांची मागणी करून मानसिक छळ केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना, राज्यपाल कार्यालयाकडून दणका देण्यात आला आहे.

Nagpur University; Finally, the Governor's Office took note of the students' complaint | नागपूर विद्यापीठ; अखेर विद्यार्थिनींच्या तक्रारीची राज्यपाल कार्यालयाकडून दखल

नागपूर विद्यापीठ; अखेर विद्यार्थिनींच्या तक्रारीची राज्यपाल कार्यालयाकडून दखल

googlenewsNext
ठळक मुद्देत्या प्राध्यापकाला कारणे दाखवा नोटीस

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पीएच.डी. नोंदणी प्रक्रियेदरम्यान विद्यार्थिनींकडे पैशांची मागणी करून मानसिक छळ केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना, राज्यपाल कार्यालयाकडून दणका देण्यात आला आहे. राज्यपाल कार्यालयाकडून आलेल्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. मनोज पांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पीएच.डी.साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातील डॉ. मनोज पांडे यांनी आपल्याला अपमानास्पदरीत्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला. डॉ. पांडे यांनी आराखड्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला व विभागाच्या कार्यक्रमासाठी पाचशे रुपयांची मागणी केल्याचादेखील दावा या मुलींनी केला होता. यानंतर विद्यापीठाने सेवानिवृत्त न्यायाधीश मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या तक्रारीवर विद्यापीठाने सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्रा घेतला. कुलगुरूंनी तर विद्यार्थिनींच्या सिनॉप्सिसवरदेखील शंका व्यक्त केली. यासंबंधात राज्यपाल कार्यालय व उच्च-तंत्रशिक्षण विभागाकडेदेखील तक्रारी गेल्या. विभागाकडून विद्यापीठाला जाब विचारण्यात आला, तर राज्यपाल कार्यालयाकडूनदेखील फोनवर विचारणा झाली.

अखेर विद्यापीठाने डॉ. पांडे यांना नोटीस बजावली. या नोटिसीचे पांडे यांनी लगेच उत्तर सादर केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चौकशी समितीचा अहवाल कधी येणार?

मागील सोमवारी विद्यापीठाने चौैकशी समिती गठित केली होती. या समितीचा अहवाल नेमका कधी येणार, अशी विचारणा विद्यापीठ वर्तुळातून होत आहे. या अहवालात समितीसमोर डॉ. पांडे यांचे उत्तरदेखील सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘सिनेट’ विसर्जित करण्यामागे हेच प्रकरण?

सोमवारी कुलगुरूंनी केवळ दोनच मिनिटात सिनेटची बैठक गुंडाळली. विद्यार्थिनींच्या या तक्रारीवरून सदस्य कुलगुरू व प्रशासनाला घेरणार होते. याची कुणकूण प्रशासनाला अगोदरच लागली होती. देण्यासाठी ठोस उत्तरच नसल्याने कुलगुरूंनी ही सभा गुंडाळली तर नाही ना, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे.

Web Title: Nagpur University; Finally, the Governor's Office took note of the students' complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.