नागपूर विद्यापीठ : बृहत् आराखड्यात कौशल्यविकासावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:40 AM2018-09-14T10:40:17+5:302018-09-14T10:40:44+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा तयार झाला असून प्रशासनाने तो राज्य शासनाला सादर केला आहे. विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बृहत् आराखड्याला ह्यमाहेडह्ण या वैधानिक आयोगाची लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आतापर्यंत बृहत् आराखड्याच्या नावाखाली डोळे मिटून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाचा स्तर खालावला. मात्र २०१६ च्या सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींनुसार प्रत्येक विद्यापीठाने पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. विद्यापीठांचे बृहत् आराखडे म्हणजे निव्वळ नवीन महाविद्यालयांना मान्यता ही संकल्पना मोडून काढत सर्वांगीण विकासावर भर कसा राहील, असे यात अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यापीठाने तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापित केली होती. विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या होत्या.
सखोल अभ्यास केल्यानंतर विद्यापीठाने शास्त्रीय पद्धतीने बृहत् आराखडा तयार केला. यात वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे. बृहत् आराखड्यात कौशल्याधिष्ठित व विविध विद्याशाखांना एकत्रितपणे जोडणारे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. यात सुमारे २०० नवे अभ्यासक्रम अधोरेखित करण्यात आले आहेत. उद्योगक्षेत्राला अपेक्षित असणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठातून तयार कसे होईल, याचा यात विचार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ व महाविद्यालयांत संशोधन वाढीसंदर्भातदेखील विशेष उद्दिष्टे प्राधान्यक्रमाने ठरविण्यात आली आहेत.
ग्रामीण भागासाठी विशेष उद्दिष्टे
बृहत् विकास आराखडयाची चौकट निश्चित करताना ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबाबतदेखील मुद्दे प्रस्तावित आहेत. सोबतच या भागातील उच्चशिक्षण सुविधा, सामाजिक समस्या संशोधनातून सोडविण्याची जबाबदारी, उद्योजकता विकास, स्वायत्तता यावरदेखील भर देण्यात आला आहे. परीक्षा प्रणालीतील सुधारणांचे उद्दीष्टदेखील ठेवण्यात आले आहे.
काय असतो बृहत् आराखडा?
येणाऱ्या कालावधीत विद्यापीठाचा विकास नेमका कसा व्हावा, विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देण्यात येईल, कशाप्रकारचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील, कौशल्य विकासासाठी काय पावले उचलली जातील या बाबींचा बृहत् आराखड्यात समावेश असतो. सोबतच उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे, रोजगारासाठी प्रयत्न करणे, या बाबींना डोळ्यासमोर ठेवूनदेखील सर्वांच्या प्रतिक्रिया मागवून मग एक योजना तयार करण्यात येते. सर्वसमावेशक विकास असा उद्देश असलेली ही योजना दीर्घ कालावधीसाठी असते.