बीए अॅडिशनलची परीक्षा घेण्याचा नागपूर विद्यापीठाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 11:02 AM2021-08-18T11:02:35+5:302021-08-18T11:03:48+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बीए अॅडिशनल अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याचाच विसर पडला आहे. मागील दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजनच करण्यात आलेले नाही.
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बीए अॅडिशनल अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याचाच विसर पडला आहे. मागील दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजनच करण्यात आलेले नाही. अभ्यासक्रमाची परीक्षा होणार की नाही हेदेखील निश्चित झालेले नाही.
मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याच्या उन्हाळी परीक्षा २०२० चे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्यात आले होते. हिवाळी-२०२० परीक्षांचे आयोजन या वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आले तर उन्हाळी-२०२१ परीक्षा जूनपासून आयोजित करण्यात आल्या. मात्र या परीक्षांमध्ये एकदाही बीए-अॅडिशनल अभ्यासक्रमाच्या परीक्षेबाबत विचार करण्यात आला नाही. परीक्षा विभागाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोरोना संसर्ग असतानादेखील परीक्षा विभागाने बीएड अभ्यासक्रमाच्या ऑफलाईन परीक्षांचे २०२० मध्ये आयोजन केले होते. परंतु आमची परीक्षाच घेण्यात आलेली नाही. त्यामुळे तणाव वाढतो आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
आता परीक्षा घेऊ शकत नाही
यासंबंधात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीदेखील याला दुजोरा दिला. कोरोनाची स्थिती पाहता आता या परीक्षा होऊ शकत नाही. त्यांचे आयोजन कधी होईल हेदेखील सांगितल्या जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमात नेमके किती विद्यार्थी आहेत याचीदेखील नेमकी माहिती उपलब्ध नाही.