नागपूर विद्यापीठ : माजी विद्यार्थी बदलविणार ‘फार्मसी’ विभागाचा ‘लूक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:36 AM2018-09-21T00:36:43+5:302018-09-21T00:37:29+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधविज्ञान म्हणजेच ‘फार्मसी’ विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विभागाचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोट्यवधी रुपये एकत्र करण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. यासंदर्भातील पहिल्या टप्प्याला नुकतीच सुुरुवात झाली. मागील ६२ वर्षांत प्रथमच असा विधायक प्रयोग राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधविज्ञान म्हणजेच ‘फार्मसी’ विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विभागाचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोट्यवधी रुपये एकत्र करण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. यासंदर्भातील पहिल्या टप्प्याला नुकतीच सुुरुवात झाली. मागील ६२ वर्षांत प्रथमच असा विधायक प्रयोग राबविण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठाच्या औषधविज्ञान विभागाची सुरुवात १९५६ साली झाली. त्यानंतर येथून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली. विभागाच्या माजी विद्यार्थ्यांची संघटनेकडून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजनदेखील करणे सुरू झाले. मात्र विभागाचे आपण आणखी काहीतरी देणे लागतो या विचारातून माजी विद्यार्थी संघटनेने इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला.
विभागाच्या नूतनीकरणासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात सभागृहाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरुप देण्यात येणार आहे. सोबतच विद्यार्थिनींसाठी ‘कॉमनरुम’, ‘कॉन्फरन्स रुम’ यांचेदेखील बांधकाम होईल. यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून विद्यार्थ्यांनीच ही रक्कम उभी केली आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत या पहिल्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन झाले. मार्च २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विभागप्रमुख डॉ.जस्मीन आवारी व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुहास दासवडीकर हेदेखील उपस्थित होत्या. ‘युडीपीएस’ माजी विद्यार्थी संघटना समन्वयक डॉ.प्रकाश इटनकर यांनी प्रास्ताविकादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. डॉ.प्रशांत पुराणिक यांनी आभार मानले.
या कार्यासाठी विभागाचे माजी विद्यार्थी पुरुषोत्तम अग्रवाल, सतीश राजकोंडावार, प्रदीप गद्रे, सुधीर देशपांडे, डॉ.अन्वर दाऊद, रवलीनसिंग खुराणा, सारंग उपगन्लावार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
महागडी यंत्रेदेखील दुरुस्त केली
विभागामधील काही महागडी यंत्रे नादुरुस्त झाली होती. यांच्या दुरुस्तीचा खर्च हा फार जास्त होता. विद्यापीठाच्या तरतुदीमधून ते शक्य नव्हते. अशा स्थितीत माजी विद्यार्थी संघटनेने यासाठी पुढाकार घेतला व महागडी यंत्रे दुरुस्त करुन देण्यासाठी सहकार्य केले. पुढील पाच वर्ष या यंत्रांच्या देखरेखीचा भारदेखील संघटनेने आपल्या खांद्यावर उचलला आहे.