नागपूर विद्यापीठ : अभ्यास मंडळांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:49 PM2018-06-27T22:49:14+5:302018-06-27T22:50:14+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून होणार आहेत. ५५ अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत परिषदेच्या स्थापनेची प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे. अभ्यास मंडळावर आपले वर्चस्व रहावे यासाठी विविध संघटनांची मोर्चेबांधणी सुरू असून विद्यापीठ वर्तुळात भेटीगाठींचे प्रमाण वाढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून होणार आहेत. ५५ अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत परिषदेच्या स्थापनेची प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे. अभ्यास मंडळावर आपले वर्चस्व रहावे यासाठी विविध संघटनांची मोर्चेबांधणी सुरू असून विद्यापीठ वर्तुळात भेटीगाठींचे प्रमाण वाढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नव्या कायद्यानुसार अभ्यास मंडळावर तीन सदस्यांची निवडणुकीने नियुक्ती झाली. तर सहा सदस्य हे कुलगुरूंनी नामित केलेले आहेत. त्यातून एक अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. नागपूर विद्यापीठाने विविध विषयनिहाय निवडणूक वेळापत्रक घोषित केले होते. अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १३ ते २२ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. २४ जून रोजी उमेदवारांची तात्पुरती यादी प्रकाशित झाली. त्यावर अपील करण्याची २५ जूनपर्यंतची मुदत होती व २८ जूनपर्यंत त्यावर कुलगुरूंना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तसेच २९ जून रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. ३० जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत दिली आहे. परंतु प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय हे वेळापत्रक वेगळे आहे. प्रत्यक्ष निवडणुका या २ जुलैपासून सुरू होतील व ५ जुलैपर्यंत चालतील. सद्यस्थितीत अभ्यास मंडळांवर नामनिर्देशित झालेल्या सदस्यांमध्ये शिक्षण मंचाचे वर्चस्व आहे. अनेक मंडळांवर ‘सेक्युलर पॅनल’ तर काहींवर ‘यंग टीचर्स असोसिएशन’चे तीन-तीन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. प्रत्येक संघटना यासाठी कामाला लागली आहे. शिक्षण मंचच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तर राजकीय चेहरेदेखील फिरताना दिसून येत आहेत.
सद्यस्थितीत शिक्षण मंचचा वरचष्मा
अभ्यासमंडळावर कुलगुरूंकडून विविध अभ्यासमंडळांवर प्रत्येकी सहा जणांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. जर नामनिर्देशन झालेल्या नावांवर नजर टाकली तर अनेक नावे शिक्षण मंचशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे.
कुलगुरूंनी नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार हा विद्यापीठाच्या विभागातील आहे तर उर्वरित जण संलग्नित व संचालित महाविद्यालयातील आहे.