नागपूर विद्यापीठाला संशोधनापेक्षा सौंदर्यीकरणाची जास्त चिंता : ३८२ कोटींचा अर्थसंकल्प संमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:08 PM2019-03-14T22:08:44+5:302019-03-14T22:09:57+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही नवीन रिसर्च फेलोशिपची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात संशोधनापेक्षा इमारतींची डागडुजी व सौंदर्यीकरणावर जास्त भर देण्यात आला आहे. गुरुवारी २०१९-२० या वर्षासाठी विद्यापीठाचा ३८२ कोटींचा अर्थसंकल्प सूचना व अटींसह मान्य करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही नवीन रिसर्च फेलोशिपची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात संशोधनापेक्षा इमारतींची डागडुजी व सौंदर्यीकरणावर जास्त भर देण्यात आला आहे. गुरुवारी २०१९-२० या वर्षासाठी विद्यापीठाचा ३८२ कोटींचा अर्थसंकल्प सूचना व अटींसह मान्य करण्यात आला.
विधीसभेत डॉ.विनायक देशपांडे यांनी अर्थसंकल्प मांडला. यातील २०.३८ टक्के भाग हा इमारतींच्या डागडुजीसाठी ठेवण्यात आला आहे. तर परीक्षेच्या कामांसाठी २०.३५ टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण योजनेसाठी १ कोटी ६५ लाख तर रिसर्च फेलोशिपसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रासाठी केवळ पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वसतिगृहांमधील आवश्यक सुविधांसाठी २३ लाखांची तरतूद आहे.
सिंथेटिक ट्रॅक, संविधान पार्क, विविध परिसरांतील प्रवेशद्वार, सुरक्षाभिंत तसेच सौंदर्यीकरणासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी ११ कोटी तर ‘रेकॉर्ड’चे ‘डिजिटलायझेशन’ करण्यासाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी ‘इन्क्युबेशन सेंटर’ विकसित करण्यात येणार आहे व यासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात पहिल्यांदाच आकस्मिक खर्चासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
तूट कशी भरून काढणार
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पातील तूट ही ४१.४४ कोटींवर पोहोचली आहे. विद्यापीठात अनेक खर्च अनावश्यक आहेत. ही तूट भरून कशी काढणार याचा कुठेही अर्थसंकल्पात उल्लेख का नाही, असा प्रश्न विधीसभेत उपस्थित झाला. डॉ.बबन तायवाडे यांनी यावर प्रशासनावर टीकादेखील केली. अनावश्यक खर्चामध्ये कपात करावी, अशी मागणी अॅड.मनमोहन बाजपेयी यांनी केली. यासोबतच इतरही सदस्यांनी सूचना दिल्या. सदस्यांचा दबाव लक्षात घेता कुलगुरूंनी सूचनांसह अर्थसंकल्पाला मान्यता दिली. याबाबतदेखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.