नागपूर विद्यापीठ : ‘एम्फी थिएटर’साठी सरकारला आणखी १५ एकर जमीन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 09:17 PM2019-01-10T21:17:25+5:302019-01-10T21:18:54+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’जवळील जागेवर राज्य शासनातर्फे भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाला विद्यापीठाकडून आणखी १५ एकर जागा देण्यात येणार आहे. यापूर्वीदेखील विद्यापीठाने शासनाला जागा दिली होती व आता एकूण २३.३० एकर जागेवर सभागृह, ‘एम्फी थिएटर’ व ‘पार्किंग’चे बांधकाम करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

Nagpur University: Give 15 acres of land to the government for Amphitheater | नागपूर विद्यापीठ : ‘एम्फी थिएटर’साठी सरकारला आणखी १५ एकर जमीन देणार

नागपूर विद्यापीठ : ‘एम्फी थिएटर’साठी सरकारला आणखी १५ एकर जमीन देणार

Next
ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’जवळील जागेवर राज्य शासनातर्फे भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाला विद्यापीठाकडून आणखी १५ एकर जागा देण्यात येणार आहे. यापूर्वीदेखील विद्यापीठाने शासनाला जागा दिली होती व आता एकूण २३.३० एकर जागेवर सभागृह, ‘एम्फी थिएटर’ व ‘पार्किंग’चे बांधकाम करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
नागपूर विद्यापीठाची ‘कॅम्पस’लगत ७.७९ एकरची जागा रिकामी होती. या जागेवरील अतिक्रमण अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर दूर झाले. विद्यापीठाच्या नव्याने साकारत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या जवळच असलेल्या या जागेवर शासनाच्या मदतीने विद्यापीठाकडून दोन हजार आसनक्षमतेचे सभागृह बांधण्यात येणार होते. यासाठी विद्यापीठाकडूनदेखील काही निधी टाकण्यात येणार होता. यासाठी आराखडादेखील तयार झाला होता. मात्र संबंधित ठिकाणी शासनाकडूनच सभागृह बांधण्याची तयारी दाखविण्यात आली. आता सुमारे तीन हजार प्रवेशक्षमता असलेले सभागृह येथे बांधण्यात येणार आहे. विद्यापीठाने ही जागा शासनाच्या ताब्यात दिली.
मात्र या जागेवर सभागृहासोबत ‘एम्फी थिएटर’देखील बांधण्याचे ठरविण्यात आले. यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता होती. ३१ डिसेंबर २०१८ रोजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. यात जमीन हस्तांतरित करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निर्देश देण्याची विनंती करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यातच यासंबंधात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना जमीन देण्याबाबत मागणी केली होती. या पत्राच्या आधारावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंबंधातील प्रस्ताव मांडण्यात आला.
प्रस्तावानुसार सभागृहाच्या निर्माणासाठी ७.५ एकर जागा आवश्यक आहे, तर ‘एम्फी थिएटर’साठी ३ एकर व पार्किंगसाठी १२.८० जागा देण्याची विनंती करण्यात आली. या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. परिषदेने अंतिम मोहोर लावल्यानंतर सायंकाळी प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राच्या माध्यमातून याची माहिती दिली. पुढील काही दिवसांतच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल.
विद्यापीठाकडेच राहणार जमिनीचा ताबा
संबंधित जमीन विद्यापीठाने राज्य शासनाला दिली असली तरी याचा मूळ ताबा मात्र विद्यापीठाकडेच राहणार आहे. सोबतच सभागृह, ‘एम्फी थिएटर’ हे विद्यापीठाला नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. सोबतच या सभागृहामुळे पाण्याचा पुरवठा करणारी ‘लाईन’देखील येईल. यामुळे ‘कॅम्पस’मध्येदेखील पाण्याचा प्रश्न सुटेल, असे कुलगुरूंनी सांगितले.

Web Title: Nagpur University: Give 15 acres of land to the government for Amphitheater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.