नागपूर विद्यापीठ : विशेष दीक्षांत समारंभात राज्यपाल मुख्य अतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 12:00 AM2021-03-31T00:00:24+5:302021-03-31T00:01:54+5:30
Nagpur University special convocation ceremony राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा विशेष दीक्षांत समारंभ ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एलएलडी’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा विशेष दीक्षांत समारंभ ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एलएलडी’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी होकार दिला आहे.
सरन्यायाधीश बोबडे यांचे शिक्षण नागपूर विद्यापीठातच झाले. त्यांच्यामुळे नागपूर व विदर्भाची मान उंचावली गेली आहे. विधिक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना मानद पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून ३ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. विधिसभेनेदेखील या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या समारंभासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यासाठी पत्रदेखील पाठविण्यात आले होते. परंतु राष्ट्रपती कार्यालयाकडून वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे कुणाला निमंत्रित करावे, हा विद्यापीठासमोर प्रश्न उभा झाला होता.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, विशेष दीक्षांत समारंभ ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुख्य अतिथी राहणार आहेत. परंतु ‘कोरोना’ची स्थिती लक्षात घेता समारंभ ऑनलाईन होणार की ऑफलाईन हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. राज्यपालांना याचा निर्णय विद्यापीठावर सोडला आहे. नागपूर मनपा प्रशासनासोबत यासंदर्भात विद्यापीठाकडून संपर्क साधण्यात येईल व नेमकी स्थिती पाहता ऑनलाईन की ऑफलाईन याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.