नागपूर विद्यापीठात सहा हजार विद्यार्थ्यांचा कुणीच वाली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:22 PM2020-09-14T12:22:21+5:302020-09-14T12:22:43+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत व्यस्त आहे. पण यात एक्स्टर्नल व एक वर्षीय डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे.
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत व्यस्त आहे. पण यात एक्स्टर्नल व एक वर्षीय डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सहा हजारावर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात बीए, एमए, एलएलएम, बीए अॅडिशनल आदी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे पूर्ण लक्ष अंतिम वर्षाच्या व सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आहे. गेल्या काही दिवसात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत व परीक्षा मंडळाच्या बैठकीत सुद्धा याच विद्यार्थ्यांच्या विषयावर विचार करण्यात आला. बैठकीत एक्सटर्नल व एक वर्षीय डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनातही विचारणा केली परंतु कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा हिवाळी परीक्षेदरम्यान होणाऱ्या परीक्षेसोबत घेण्यात येईल.
उच्च शिक्षण मंत्री घेणार परीक्षेचा आढावा
ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी अंतिम वर्षाची व सेमिस्टर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत सोमवारी नागपुरात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात विदर्भातील विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक त्यांनी बोलावली आहे. या बैठकीत ते परीक्षेच्या तयारीचा आढावा घेणार आहे.