नागपूर विद्यापीठ : पेपर सेटर्सच्या गहाळ रेकार्ड्सचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:10 AM2019-07-31T00:10:04+5:302019-07-31T00:14:45+5:30
बऱ्याच काळापासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पेपर सेटर्स व मॉडरेटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा विभागाच्या गोपनीय शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्यांचे रेकार्ड शोधायला लागले असून काही पेपर सेटर्स व मॉडरेटर्सचे मानधनाचे थकीत बिल मंजुरीसाठी वित्त व लेखा अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पेपर सेटर्सचे थकीत मानधन मिळणे शक्य होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बऱ्याच काळापासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पेपर सेटर्स व मॉडरेटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा विभागाच्या गोपनीय शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्यांचे रेकार्ड शोधायला लागले असून काही पेपर सेटर्स व मॉडरेटर्सचे मानधनाचे थकीत बिल मंजुरीसाठी वित्त व लेखा अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पेपर सेटर्सचे थकीत मानधन मिळणे शक्य होणार आहे. गोपनीय शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार लवकरच बिल मंजूर करून संबंधित शिक्षकांना त्यांचे मानधन दिले जाईल. सध्या किती शिक्षकांचे मानधन शिल्लक आहे, याचीही तपासणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व रेकार्ड शोधून त्यांचे बिल वित्त व लेखा विभागाला पाठविण्यात येईल जेणेकरून मानधनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा केली जाईल.
विशेष म्हणजे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका तयार करणाºया शिक्षक व मॉडरेटर्स यांना बºयाच काळापासून त्यांचे मानधन मिळाले नव्हते. लोकमतने विद्यापीठाचा हा गलथानपणा प्रकाशात आणला होता. यासोबत या शिक्षकांचे मानधन इतर शिक्षकांनीच उचलल्याची बाब उजेडात आणली होती. मानधनाबाबत विचारणाºया शिक्षकांना त्यांचे मानधन पाठविल्याचे सांगण्यात येते. २०१६ पासून याप्रकारची प्रकरणे वाढल्याचेही दिसून येत आहे. या बातमीमुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली होती. यावर कुठल्याही प्रकारचा घोटाळा समोर येऊ नये म्हणून गोपनीय शाखेतून अनेक पेपर सेटर्स आणि मॉडरेटर्सचे मानधनासंबंधी रेकार्ड्स गायब करण्यात आले होते.
बातमीमुळे पोहचायला लागले शिक्षक
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठात शिक्षकांच्या मानधनासंबंधी भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करणारी बातमी प्रकाशित होताच प्रश्नपत्रिका तयार करणारे शिक्षक विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पोहचून चौकशी करायला लागले होते. शिक्षकांचा असा कल पाहता गोपनीय शाखेचे अधिकारी तडकाफडकी मानधनाचे बिल मंजूर करायला लागल्याचे सांगितले जात आहे.