नागपूर विद्यापीठ यंदाही देशात पहिल्या शंभरात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 09:48 PM2022-07-15T21:48:53+5:302022-07-15T21:50:29+5:30
Nagpur News ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. ‘व्हीएनआयटी’ सोडले तर सर्व संस्थांच्या यादीत एकाही महाविद्यालयाला पहिल्या ७० मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही.
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर सर्व संस्थांच्या यादीत एकाही महाविद्यालयाला पहिल्या ७० मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा सर्व संस्थांत देशात ६८ वा क्रमांक असून, अभियांत्रिकी संस्थांत ३२ वा, तर आर्किटेक्चर संस्थांत ८ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’चा सर्व संस्थांतून देशात ५७ वा क्रमांक होता. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यंदाही अपयश आले आहे.
शुक्रवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. व्हीएनआयटी वगळता इतर एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. मागील वर्षी अभियांत्रिकी संस्थांच्या यादीमध्ये रामदेवबाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज १४६ व्या क्रमांकावर आहे. जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय (१६३) यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (१८५) यांना पहिल्या २०० मध्ये स्थान आहे. तीनही महाविद्यालयांचे स्थान मागील वर्षीच्या तुलनेत घसरले आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारला नाही, हेच या ‘रँकिंग’मधून स्पष्ट होत आहे.
‘डेंटल कॉलेज’ची झेप
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नागपुरातील एकाही महाविद्यालयाला पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. परंतु शासकीय दंत महाविद्यालयाचा देशात नववा क्रमांक आहे. महाराष्ट्रातून महाविद्यालय दुसऱ्या स्थानी आहे.
‘फार्मसी’त पहिल्या शंभरात २ संस्था
देशातील ‘टॉप’ फार्मसी महाविद्यालयांमध्ये नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर फार्मसी विभाग ४२ व्या स्थानी आहे. तर कामठी येथील ‘श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी’ ला ५३ वे ‘रँकिंग’ मिळाले आहे. गुरुनानक कॉलेज ऑफ फार्मसी व दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेज १०० ते १५० या बॅन्डमध्ये आहेत.
‘आयआयएम’चा रँक घसरला
२०२१ मध्ये आयआयएम-नागपूर व्यवस्थापन संस्थांच्या गटात ४० व्या क्रमांकावर होते. यंदा रँकिंगमध्ये प्रचंड घसरण झाली असून, ४३ व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. आयएमटीचा ९५ व्या क्रमांकावर आहे.
नागपूर विद्यापीठाच्या पदरी परत निराशा
‘नॅक’चा ‘ए’ दर्जा मिळविणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र पहिल्या शंभरात ‘रँकिंग’ मिळविण्यात यश आलेले नाही. देशपातळीवर विद्यापीठ १५१ ते २०० या क्रमांकांमधील विद्यापीठांमध्ये आहे. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ यांना पहिल्या शंभरात स्थान मिळाले आहे.