नागपूर विद्यापीठ; पेटसाठी उमेदवारांकडून प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 11:18 AM2020-11-27T11:18:48+5:302020-11-27T11:19:11+5:30
Nagpur University नोव्हेंबर महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी. नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या पेटबाबत (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) घोषणा करण्यात आलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोव्हेंबर महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी. नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या पेटबाबत (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) घोषणा करण्यात आलेली नाही. यंदा नवीन दिशानिर्देश जारी होणार की नाही याबाबतदेखील अद्याप प्रशासनाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून प्रतीक्षाच सुरू आहे.
सर्वसाधारणतः पेटसाठी जून ते जुलैदरम्यान वेळापत्रक घोषित करण्यात येते व ऑक्टोबरपर्यंत निकाल लागून पुढील प्रक्रियादेखील सुरू होते. मात्र यावर्षी कोरोनाचा फटका बसला व पीएच.डी नोंदणी प्रक्रियेचा वेग संथ झाला. मागील वर्षी १९ ते २१ ऑगस्टदरम्यान पेटचा पहिला टप्पा व ६ सप्टेंबर रोजी पेटचा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला होता.२० सप्टेंबर रोजी निकालदेखील घोषित झाले होते. मात्र यंदा अद्यापपर्यंत वेळापत्रकदेखील घोषित झालेले नाही. त्यामुळे पीएचडी नोंदणीसाठी इच्छुकांची प्रतिक्षा वाढत असल्याचे चित्र आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाने पेटच्या नियमात बदल करण्याचा मानस बनविला आहे. यानुसार नवीन अध्यादेश जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. यानुसार यंदापासून पेटचा केवळ एकच टप्पा होऊ शकतो. मात्र हे दिशानिर्देश अद्याप जारी झालेले नाहीत. विद्यापीठातर्फेदेखील यासंदर्भात नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.